गोंदियात बस-ट्रकची भीषण धडक, सहा प्रवासी गंभीर

27 Aug 2025 22:03:24
 
Bus truck collision
 (Image Source-Internet)
गोंदिया :
जिल्ह्यात आज सकाळी राष्ट्रीय महामार्गावर मोठा अपघात घडला. अर्जुनी तालुक्यातील चिखली गावाजवळ खासगी बस आणि ट्रक यांची समोरासमोर भीषण टक्कर झाली. या अपघातात सहा महिन्याचं बाळासह सहा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
 
मिळालेल्या माहितीनुसार, पुष्पराज ट्रॅव्हल्सची बस हैदराबादहून रायपूरकडे प्रवास करत होती. बसमध्ये मोठ्या संख्येने मजूर प्रवासी होते आणि बस ओव्हरलोड होती. चिखली गावाजवळ ट्रकला ओव्हरटेक करताना बस चालकाचा ताबा सुटला आणि बस थेट ट्रकवर आदळली. धडकेची तीव्रता एवढी होती की बसचा पुढचा भाग पूर्णपणे चकनाचूर झाला.
 
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतकार्य सुरू केले. डुग्गीपार पोलिस आणि १०८ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. सुरुवातीला जखमींना अर्जुनी ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आलं, मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना गोंदिया जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
 
या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. पोलिसांनी अपघाताचा गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
 
काही महिन्यांपूर्वीच डव्वा गावाजवळ शिवशाही बसचा अपघात होऊन प्रवाशांचा मृत्यू झाला होता. त्या घटनेच्या जखमा अद्यापही अर्जुनी तालुक्यात ताज्या असतानाच पुन्हा एकदा बस सुरक्षेचा गंभीर प्रश्न या अपघातामुळे ऐरणीवर आला आहे.
Powered By Sangraha 9.0