लाडकी बहीण योजनेतील गोंधळावर सुप्रिया सुळे आक्रमक; सरकारकडे केली उत्तरांची मागणी

26 Aug 2025 17:29:40

Supriya Sule
(Image Source-Internet) 
इंदापूर :
लाडकी बहीण योजनेच्या (Ladki Bahin scheme) अंमलबजावणीतील पारदर्शकतेवर खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारला प्रश्न विचारले आहेत. अर्ज मंजूर व नाकारताना कोणते निकष वापरले गेले, हे सरकारने स्पष्ट करावे अशी मागणी त्यांनी केली.
 
इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर असताना माध्यमांशी बोलताना सुळे म्हणाल्या, “या योजनेवर तब्बल ४,८०० कोटी रुपये खर्च झाले. हेच पैसे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी वापरले असते, तर कित्येकांना दिलासा मिळाला असता. त्यामुळे या प्रकरणाची सखोल व पारदर्शक चौकशी झाली पाहिजे.”
 
सुळे पुढे म्हणाल्या, “निवडणुकीच्या तोंडावर सुरू झालेली योजना बंद करून प्रश्न सुटणार नाहीत. जर खरोखर लाडकी बहिणी प्रिय असतील, तर निवडणुकीनंतरही त्या लाडक्या राहिल्या पाहिजेत. सुधारणा करूनच या योजना परिणामकारक होतील. सरकारने भाऊ म्हणून आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे.”
 
दरम्यान, माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, या योजनेत २६ लाखांहून अधिक बनावट लाभार्थी आढळून आले आहेत. यातील सर्वाधिक प्रकरणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जिल्ह्यांमध्ये असल्याचे नमूद केले गेले आहे.
 
Powered By Sangraha 9.0