(Image Source-Internet)
पुणे :
गणेशोत्सव (Ganeshotsav) काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. २७ ऑगस्ट (गणेश चतुर्थी) पासून ते ७ सप्टेंबर (अनंत चतुर्दशी) पर्यंत शहरातील खडक, विश्रामबाग आणि फरासखाना या मध्यवर्ती पोलिस ठाण्यांच्या हद्दीत दारूविक्री पूर्णपणे बंद राहणार आहे.
याशिवाय, संपूर्ण पुणे जिल्ह्यात गणेश चतुर्थी आणि अनंत चतुर्दशी या दोन दिवसांमध्ये मद्यविक्रीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी याबाबत आदेश जारी केले असून, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध दारूबंदी कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
गणेशोत्सवात मध्यवर्ती भागात मानाचे आणि प्रमुख गणपती मंडळांचे दर्शन घेण्यासाठी लाखो भक्तांचा ओघ असतो. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, ५ व्या आणि ७ व्या दिवशी ज्या भागांमध्ये विसर्जन मिरवणुका निघतात, त्या भागातील दारूची दुकाने देखील बंद राहतील. तर ७ सप्टेंबर रोजी संपूर्ण महापालिका क्षेत्रातील सर्व मद्यविक्री केंद्रे बंद ठेवण्यात येणार आहेत.