मराठा आरक्षणासाठी जरांगेंचा मुंबई मोर्चा ठरला; २९ ऑगस्टला आझाद मैदानावर मोठा जमाव होणार

25 Aug 2025 11:34:25
 
Maratha reservation
 (Image Source-Internet)
मुंबई:
मराठा (Maratha) समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आंदोलनाच्या मैदानात उतरले आहेत. हजारोंच्या संख्येने मराठा बांधवांसोबत ते २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मोर्चासह दाखल होणार आहेत. या काळातच गणेशोत्सवाची लगबग सुरू असल्याने प्रशासनाला दुहेरी आव्हानांचा सामना करावा लागणार आहे.
 
प्रवासाची आखणी-
हा मोर्चा २७ ऑगस्ट रोजी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथून सुरू होईल. दोन दिवसांचा प्रवास करत आंदोलक २९ ऑगस्टच्या रात्री आझाद मैदानावर पोहोचतील.
 
मार्गक्रमण – अंतरवाली सराटी → शहागड फाटा → पिंपळगाव → आपेगाव → पैठण कमान → शेवगाव → मिरी नाका → नेप्ती चौक → आळाफाटा → शिवनेरी किल्ला (मुक्काम) → राजगुरुनगर → खेड → चाकण → तळेगाव → लोणावळा → पनवेल → वाशी → चेंबूर → आझाद मैदान.
 
 या मार्गावर ठिकठिकाणी समाजबांधव स्वागतासाठी सज्ज आहेत.
 
राज्यभरातून उसळणार लाट-
गावोगावी सभा घेऊन ‘चलो मुंबई’चा नारा दिला जात आहे. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि धाराशिव भागातून मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव मुंबईकडे रवाना होण्याची चिन्हे आहेत.
 
सरकारला थेट अल्टिमेटम-
“२६ ऑगस्टपर्यंत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाबाबत ठोस निर्णय झाला नाही, तर आम्ही थेट मुंबईकडे निघू. २९ ऑगस्ट रोजी हजारोंच्या संख्येने आझाद मैदान गाजवू,” असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.
 
मुंबईत सणासुदीचे वातावरण असतानाच हा भव्य मोर्चा येत असल्यामुळे पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. सुरक्षाव्यवस्था, वाहतूक नियंत्रण आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राखणे हे प्रशासनासमोर मोठे आव्हान ठरणार आहे.
Powered By Sangraha 9.0