‘लाडकी बहीण’ योजनेत पुन्हा ई-केवायसी करणे अनिवार्य, अपात्र लाभार्थींचा पैसा थांबणार

25 Aug 2025 20:01:18
 
Ladki Bahin scheme kyc
 (Image Source-Internet)
मुंबई :
मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण” योजनेत (Ladki Bahin scheme) मोठा बदल करण्यात आला आहे. तपासणीत अनेक महिलांनी नियम मोडून लाभ घेतल्याचे उघड झाले आहे. अहवालानुसार, २६ लाखाहून अधिक महिलांनी चुकीच्या मार्गाने योजनेचा फायदा घेतला, ज्यामुळे राज्याला कोट्यवधी रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे.
 
सरकारने ठरवले आहे की आता ई-केवायसी करणे सर्व लाभार्थ्यांसाठी बंधनकारक असेल. या प्रक्रियेतून अर्जदारांची पडताळणी होईल आणि नियम पाळणाऱ्या महिलांनाच पुढील हप्त्यांचा लाभ मिळेल. जर ई-केवायसी वेळेत पूर्ण केली नाही, तर खात्यात पैसे जमा होणार नाहीत.
 
सुरुवातीला २ कोटी ६३ लाख महिलांना लाभ मिळत होता, पण जून महिन्यापासून तपासणीनंतर २६ लाख महिला योजनेच्या यादीतून बाहेर राहिल्या आहेत. त्यामुळे आता फक्त २ कोटी ४१ लाख महिलांनाच लाभ मिळणार आहे.
 
योजनेतून अपात्र ठरलेली वर्गवारीही स्पष्ट करण्यात आली आहे. यात वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त असलेली कुटुंबे, सरकारी कर्मचारी किंवा निवृत्त अधिकारी असलेली कुटुंबे, आयकर भरणारे, आमदार-सांसद किंवा उच्चपदस्थ अधिकारी असलेली कुटुंबे, चारचाकी वाहनधारक (ट्रॅक्टर वगळता) आणि इतर योजनांमधून दरमहा लाभ घेणाऱ्या महिलांचा समावेश आहे. विवाहानंतर महाराष्ट्राबाहेर स्थायिक झालेल्या महिलांनाही योजनेचा लाभ मिळणार नाही.
 
विरोधकांनी या निर्णयावर टीका केली आहे. निवडणुकीपूर्वी सर्वांना लाभ देणारे सरकार आता छाननीच्या नावाखाली लाखो महिलांना बाहेर काढत असल्याचा आरोप केला जात आहे. जिल्हा परिषदेत काम करणाऱ्या काही महिला कर्मचाऱ्यांनी चुकीची माहिती दिल्यामुळे लाभ घेतल्यास त्यावर कारवाई होईल की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Powered By Sangraha 9.0