बिग बॉस १९मध्ये अंडरटेकरची एंट्री? शोच्या इतिहासातील सर्वांत महागडा स्पर्धक ठरण्याची शक्यता

22 Aug 2025 21:10:18
 
Undertaker entry
 (Image Source-Internet)
 
सलमान खानच्या लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस १९’ (Bigg Boss 19) चा प्रीमियर होण्याआधीच चर्चांना उधाण आले आहे. यंदाच्या सीझनमध्ये अनेक सरप्राईजेस असतील, अशी चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. त्यातच आता चर्चेत आलेलं नाव म्हणजे डब्ल्यूडब्ल्यूईचा दिग्गज रेसलर अंडरटेकर.
 
माध्यमांतून समोर आलेल्या माहितीनुसार, अंडरटेकर बिग बॉसमध्ये वाइल्डकार्ड एन्ट्रीद्वारे दिसू शकतो. तो नोव्हेंबरमध्ये बिग बॉसच्या घरात प्रवेश करून साधारणपणे ७ ते १० दिवसांचा मुक्काम करू शकतो. जरी अद्याप निर्मात्यांकडून अधिकृत घोषणा झालेली नसली तरी, या चर्चेमुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अंडरटेकरने २०२० मध्ये कुस्ती विश्वाला अलविदा केलं असलं तरी, त्याचा प्रभाव आणि लोकप्रियता आजही कायम आहे.
 
सर्वाधिक मानधन घेणारा स्पर्धक?
बिग बॉसच्या इतिहासात डब्ल्यूडब्ल्यूईतील स्टार्स आधीही झळकले आहेत. सीझन ४ मध्ये ग्रेट खली सहभागी झाला होता आणि त्याला एका आठवड्यासाठी तब्बल ५० लाख रुपये मानधन मिळाले होते. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, अंडरटेकरची लोकप्रियता पाहता तो या शोच्या इतिहासातील सर्वांत जास्त मानधन घेणाऱ्या सेलिब्रिटींपैकी एक ठरू शकतो.
 
२४ ऑगस्टपासून बिग बॉस १९-
या सीझनची सुरुवात १५ स्पर्धकांसोबत होईल, त्यानंतर ३ वाइल्डकार्ड एण्ट्रीज मिळून घरातील सदस्यांची संख्या १८ होईल. शोची थीम आहे ‘घरवालों की सरकार’. २४ ऑगस्टपासून हा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, रात्री ९ वाजता जिओ हॉटस्टारवर स्ट्रीम होईल आणि रात्री १०.३० वाजता कलर्स टीव्हीवर प्रसारित केला जाईल.
 
संभाव्य स्पर्धकांच्या यादीत गौरव खन्ना, अश्नूर कौर, बसीर अली, अभिषेक बजाज, सिवेत तोमर, अवेज दरबार आणि नगमा मिराजकर यांचा समावेश असल्याची चर्चा आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.
Powered By Sangraha 9.0