उपराष्ट्रपती निवडणुकीत राजकीय हालचाली वेगवान;फडणवीसांचा शरद पवारांना फोन

22 Aug 2025 16:17:16
 
CM Fadnavis
 (Image Source-Internet)
मुंबई :
उपराष्ट्रपती जगदीश धनकड यांच्या अचानक राजीनाम्यानंतर देशाचे लक्ष आता नव्या उपराष्ट्रपती निवडणुकीकडे (Vice Presidential election) लागले आहे. भाजप-एनडीएने महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना उमेदवारी जाहीर केली असून ही निवडणूक बिनविरोध पार पडावी, अशी भाजपची इच्छा आहे. यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वपक्षीय नेत्यांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे.
 
सूत्रांच्या माहितीनुसार, फडणवीसांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांना वैयक्तिक फोन करून राधाकृष्णन यांना पाठिंबा द्यावा, अशी विनंती केली. “उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत आम्हाला तुमचाही पाठिंबा हवा आहे”, असे मुख्यमंत्र्यांनी या संभाषणात म्हटल्याचे सांगितले जाते. मात्र, काँग्रेसकडील कोणत्याही नेत्याला फडणवीसांनी संपर्क साधल्याचे वृत्त नाही.
 
विरोधी पक्ष एकत्र; बी. सुदर्शन रेड्डी यांचा अर्ज दाखल
दरम्यान, काँग्रेससह इंडिया आघाडीने सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांना उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी दिली आहे. संसद भवनात झालेल्या अर्ज दाखल कार्यक्रमाला राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासह प्रमुख विरोधी नेते उपस्थित होते. या वेळी “ही लढाई संविधान व लोकशाही टिकवण्याची आहे. सुदर्शन रेड्डी हे या मूल्यांचे खरे रक्षक ठरतील,” असे ट्विट शरद पवारांनी केले.
 
यामुळे, ठाकरे गट आणि शरद पवार गटाने स्पष्टपणे इंडिया आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, फडणवीसांनी केलेल्या फोन कॉल्समुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
Powered By Sangraha 9.0