नागपूर:
ब्रह्माकुमारी संस्थेच्या माजी मुख्य प्रशासक राजयोगिनी दादी प्रकाशमणी यांच्या १८व्या पुण्यतिथीनिमित्त २५ ऑगस्टला जागतिक बंधुता दिनानिमित्त भारत आणि नेपाळभर भव्य रक्तदान महाअभियान राबवले जाणार आहे. या अभियानातून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या अभियानाचा शुभारंभ १७ ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथे केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांच्या हस्ते झाला. त्यानंतर भारत आणि नेपाळमधील संस्थेच्या सहा हजारांहून अधिक सेवा केंद्रांवर रक्तदान शिबिरे आयोजित केली जात आहेत.
नागपूरमध्ये २४ ऑगस्ट रोजी वसंत नगर येथील इंद्रप्रस्थ भवन येथे सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत विदर्भस्तरीय रक्तदान शिबिर भरवले जाईल. या अभियानात एक लाख युनिट रक्तदान करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. रक्तदानासाठी १८ ते ६५ वर्षे वयोगटातील, किमान ५० किलो वजन असलेले तसेच निरोगी व्यक्ती पात्र ठरतील. तज्ज्ञांच्या मते, रक्तदानामुळे नवीन रक्त तयार होण्याची प्रक्रिया वेगवान होते आणि इतरांचे जीव वाचवण्याबरोबर रक्तदात्यालाही आरोग्य फायदे होतात. नागपूर सेवा केंद्राच्या प्रभारी बी.के. राजयोगिनी रजनी दीदी यांनी या पुण्यकार्यामध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले असून अधिक माहितीसाठी ९९६०३८५०३८ या क्रमांकावर संपर्क साधावा असे सांगितले आहे.