(Image Source-Internet)
नवी दिल्ली :
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आणि खासदार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) हजेरी लावल्याने नवा वाद पेटला आहे. या कार्यक्रमातील त्यांचा फोटो सोशल मीडियावर समोर आल्यानंतर विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले. अजित पवार स्वतःला पुरोगामी विचारसरणीचा मानणारे असल्याचा दावा करतात, मात्र त्यांच्या पत्नी संघाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याने दुटप्पीपणाचा आरोप होत आहे. यावर आता अजित पवारांचे पुतणे आणि बारामतीचे आमदार रोहित पवार यांनी थेट प्रतिक्रिया दिली आहे.
रोहित पवार म्हणाले की, ओबीसी आरक्षण दिलं जात असताना संघाची भूमिका काय होती, हे सुनेत्रा पवारांनी विचारायला हवं होतं. अजित पवार सत्तेत गेले आहेत, मात्र त्यांच्यावर दबाव आणून त्यांना अशा बैठकींना पाठवलं जात असावं. अशा प्रकारे फोटो समोर येतात तेव्हा संदेश दिला जातो की त्यांनी संघाचे विचार स्वीकारले आहेत. हा संघाचा हेतू असल्याचे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, एका बाजूला यशवंतराव चव्हाण, शिव-फुले-शाहू-आंबेडकरांचे नाव घेतलं जातं, पुरोगामी विचारसरणी मांडली जाते, पण दुसऱ्या बाजूला संघाच्या बैठकींना उपस्थिती लावली जाते. ही स्पष्टपणे दुटप्पी भूमिका आहे. आजच्या राजकारणात जनतेला अशी दुटप्पी भूमिका नको आहे, असे ते म्हणाले.
वाद वाढल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी स्वतः स्पष्टीकरण दिले. त्यांनी सांगितले की, त्या बैठकीला जाण्यामागे कोणताही राजकीय हेतू नव्हता. राज्यसभेच्या खासदार म्हणून विविध महिला संघटनांचे काम समजून घेण्याची संधी मिळावी म्हणून त्या गेल्या होत्या. तिथे विविध राज्यांतील महिला सहभागी होत्या आणि त्यांची कार्यपद्धती जाणून घेण्यासाठीच त्या उपस्थित राहिल्या. त्यावेळी त्यांना बोलण्यास सांगितले गेले तेव्हा त्यांनी फक्त काही शब्दांत आपले विचार मांडले. समाजातील महिलांचे कार्य समजून घेणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे हाच उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, कंगना रणौत यांनी आपल्या ट्विटर खात्यावर काही छायाचित्रे पोस्ट केली आहेत. त्यांच्या घरात राष्ट्र सेविका समितीच्या महिला शाखेचा कार्यक्रम झाल्याचे त्यांनी म्हटले. सनातन मूल्ये आणि हिंदू संस्कृती जपण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. याच छायाचित्रांमध्ये सुनेत्रा पवार भाषण करताना दिसल्याने हा वाद अधिक चिघळला आहे.