नको तिथं भीती दाखवू नका, मुंबईच्या प्रश्नांवर लक्ष द्या; राज ठाकरे यांचा सरकारवर हल्लाबोल

21 Aug 2025 15:45:28
 
Raj Thackeray
 (Image Source-Internet)
मुंबई :
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेतून राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला. मुंबईतील पार्किंगची समस्या, वाढती वाहनसंख्या आणि बाहेरून येणाऱ्या लोकांच्या लोंढ्यांवर त्यांनी थेट भाष्य करत सरकारला फटकारलं.
 
राज ठाकरे म्हणाले, “नको तिथं सरकार भीती दाखवतं, पण इथे शिस्त लावा ना. मुंबईत रोज नवनवीन लोक येत आहेत. रस्ते मोठे होत नाहीत, मात्र इमारती सतत उंचावत आहेत. वाहतूक आणि पार्किंगचं व्यवस्थापन पूर्णपणे कोलमडलं आहे.”
 
पार्किंगच्या प्रश्‍नावर संताप-
ठाकरे यांनी पुढे सांगितले की, “गाड्यांचे दर पाहिले तर पार्किंगचे दर लोकांना परवडू शकतात. महिन्याला दोन-तीन हजार दिले तरी गाडी सुरक्षित राहते. सी-लिंकमध्ये पार्किंग लॉट करायचा होता, पण काही दबावामुळे तो रद्द करण्यात आला. काही धनदांडग्यांच्या सांगण्यावरून पार्किंगचं नियोजन रद्द करणं योग्य नाही.”
 
मुंबईत लोकांची गर्दी रोखा-
मुंबईबाहेरून येणाऱ्या लोकांबाबतही राज ठाकरे यांनी सरकारवर टीका केली. “या शहरात रोज लोक आदळत आहेत. माणसं येणं थांबवलं पाहिजे. वाहनांवर नियंत्रण आणलं पाहिजे, फक्त ब्रिज आणि मेट्रो करून प्रश्न सुटणार नाही. पुण्यासारखी परिस्थिती होईल. थायलंडला जा आणि बघा, तेथील शिस्तीत वाहतूक व्यवस्थापन कसं आहे.”

धारावीतील प्रकल्प, अदानी आणि अर्बन नक्षल-
धारावी पुनर्विकास आणि अदानी समूहाच्या प्रकल्पांवरही राज ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केले. “उद्या धारावीतील जमिनी अदानीच्या घशात घालण्यात येणार आहेत. मग काय होणार आहे? सरकारने याचं उत्तर द्यायला हवं. अर्बन नक्षलचा राग दाखवता, पण खऱ्या ठिकाणी शिस्त लावा, हाच प्रश्न आहे.”
 
मनसे प्रमुखांच्या या पत्रकार परिषदेतून मुंबईतील वाहतूक, पार्किंग आणि लोकसंख्या वाढीचे गंभीर मुद्दे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
Powered By Sangraha 9.0