(Image Source-Internet)
पुणे :
पुणे (Pune) जिल्ह्याच्या इतिहासात नवा अध्याय लिहिला गेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या राजधानीचा मान राखत वेल्हे तालुक्याचे नामकरण बदलून आता त्याला ‘राजगड तालुका’ अशी नवी ओळख मिळाली आहे.
सरकारची घोषणा-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय जाहीर केला. राज्य सरकारच्या महसूल विभागाने मंजुरी दिल्यानंतर केंद्र सरकारकडूनही हिरवा कंदील मिळाला आहे. लवकरच या बदलाचे राजपत्र (Gazette Notification) प्रसिद्ध होणार आहे.
ग्रामपंचायतींचा ठराव, नागरिकांचा उत्साह-
वेल्हे तालुक्यातील एकूण ७० ग्रामपंचायतींपैकी तब्बल ५८ ग्रामपंचायतींनी तालुक्याचे नाव ‘राजगड’ करण्याचा ठराव मंजूर केला होता. पुणे जिल्हा परिषदेकडूनही या निर्णयाला समर्थन मिळाले. स्थानिक नागरिकांनी आनंद व्यक्त करताना म्हटले –
“राजगड हे नाव आल्याने शिवराज्याचा मान, अभिमान आणि गौरव अधिक उंचावेल.”
पर्यटन आणि अर्थव्यवस्थेला चालना-
राजगड किल्ल्याच्या नावावरून तालुक्याचे नामकरण झाल्याने पर्यटनाला नवे बळ मिळेल आणि स्थानिक अर्थव्यवस्था उभी राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या राजधानीचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित होणार असून, नागरिकांना आपल्या परंपरेशी नवे नाते जोडता येणार आहे.