(Image Source-Internet)
नागपूर:
गणेशोत्सव जवळ येत असून शहरातील मंडळे सजावटीसाठी आणि कार्यक्रमासाठी जोरदार तयारी करत आहेत. या पार्श्वभूमीवर महावितरणने (Mahavitaran) सार्वजनिक गणेश मंडळांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
सार्वजनिक गणेश मंडळांना यंदा उत्सवाच्या काळात घरगुती दराने तात्पुरती वीज जोडणी मिळणार आहे. अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता राजेश नाईक यांनी मंडळांना या सुविधेचा फायदा घेण्याचे आवाहन केले आहे.
तात्पुरती वीज जोडणीसाठी मंडळांनी खालील कागदपत्रे तयार ठेवावी: नोंदणी प्रमाणपत्र, स्थानिक स्वराज्य संस्था व पोलिस परवाना, विद्युत निरीक्षकाचे सुरक्षिततेचे प्रमाणपत्र, वीज मागणी अर्ज, चाचणी अहवाल, आणि बँक खाते पासबुकाची छायाप्रती. ही कागदपत्रे जवळच्या महावितरण कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे.
गणेशोत्सवात वीज अपघात टाळण्यासाठी मंडप, रोषणाई आणि सजावटीसाठी विद्युत सुरक्षा नियमांचे पालन अनिवार्य आहे. वीजसंच मान्यताप्राप्त ठेकेदारांकडून लावणे आणि महावितरण शाखा अभियंत्यांचे संपर्क क्रमांक नोंदवणे गरजेचे आहे.
तत्पुरती वीज जोडणीसाठी गणेश मंडळांनी अनामत रक्कम ऑनलाइन भरावी. उत्सव संपल्यानंतर वीजबिल वगळता उरलेली रक्कम लगेच परत केली जाईल, असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.