रायगडच्या उरणमध्ये बोट बुडाली; हेलिकॉप्टरच्या मदतीने सात मच्छीमार बचावले

21 Aug 2025 15:49:54
 
Boat capsizes
 (Image Source-Internet)
मुंबई :
गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह उपनगर आणि किनारी भागांमध्ये पावसाने जोर धरला असून, समुद्रालाही उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर रायगड (Raigad) जिल्ह्यातील उरण परिसरात एका मासेमारी बोटीला अपघात झाल्याची घटना घडली. समुद्राचे पाणी आत शिरल्यामुळे ही बोट थेट बुडाल्याची माहिती समोर आली आहे.
 
समुद्रात हादरलेली बोट-
अपघातग्रस्त बोट गुजरातमधील मच्छीमारांची असल्याचे सांगितले जात आहे. पाणी भरल्याने बोट संतुलन गमावून काही क्षणांत समुद्रात बुडाली. अपघाताच्या वेळी या बोटीत सात खलाशी होते. सुदैवाने तातडीने मदतकार्य राबवण्यात आल्याने सर्वांना वाचवण्यात यश आले.
 
हेलिकॉप्टरची मदत-
खलाशांच्या जीवितासाठी नौदल आणि कोस्टगार्डकडून युद्धपातळीवर बचावमोहीम हाती घेण्यात आली. हेलिकॉप्टरच्या मदतीने सातही खलाशी सुखरूप बाहेर काढण्यात आले. अपघाताचे काही व्हिडीओही समोर आले असून, त्यात बोट पाण्यात हेलकावे खाताना तसेच लोकांनी लाईफ जॅकेट घालून खलाशांना वाचवताना दृश्ये दिसत आहेत.
 
बंदी असूनही मच्छीमार समुद्रात-
सध्या समुद्र उधाणलेला असल्यामुळे मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत. तरीही धोका पत्करून काही बोटी मासेमारीसाठी समुद्रात जात आहेत. यामुळे अशा दुर्घटनांचा धोका वाढत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. काही दिवसांपूर्वीच अलिबागमध्ये अशाच प्रकारची घटना घडली होती, ज्यात तिघांचा मृत्यू झाला होता.
Powered By Sangraha 9.0