(Image Source-Internet)
मुंबई :
बेस्ट (BEST) कर्मचारी सहकारी पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे गट आणि मनसेच्या संयुक्त ‘उत्कर्ष पॅनेल’ला मोठा पराभव पत्करावा लागला आहे. शशांक राव यांच्या पॅनेलने १४ जागांवर विजय मिळवत बहुमत मिळवलं, तर महायुतीचा ‘सहकार समृद्धी पॅनेल’ ७ जागांवर विजयी झाला. मात्र, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली उभं राहिलेलं ‘उत्कर्ष पॅनेल’ एकाही जागेवर यश मिळवू शकलेलं नाही. परिणामी, गेल्या नऊ वर्षांपासून पतपेढीवर असलेलं ठाकरे गटाचं वर्चस्व संपुष्टात आलं आहे.
सुहास सामंतांचा आरोप-
निकाल जाहीर झाल्यानंतर ठाकरे गटाचे बेस्ट कामगार सेना अध्यक्ष सुहास सामंत यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे प्रतिक्रिया दिली. त्यांनी शशांक राव पॅनेलचे अभिनंदन केले, पण याच वेळी भाजपवर गंभीर आरोपही केले.
सामंत म्हणाले, “बारा हजार कर्मचारी आमच्या पॅनेलसोबत असूनही आम्ही हरलो. कारण मागील आठवडाभरापासून पैशांचा जबरदस्त वापर होताना दिसला. आम्हाला वाटलं, कर्मचारी पैसे स्वीकारतील पण मतदान आमच्यासाठी करतील. मात्र पैशाच्या प्रभावापुढे आमची प्रामाणिक मते फिकी पडली.”
ते पुढे म्हणाले, “भाजपसारखा मोठा पक्ष एका पतपेढीच्या निवडणुकीसाठी एवढी मोठी यंत्रणा वापरतो, हे आश्चर्यकारक आहे. आम्ही संपर्क आणि आर्थिक जोर या दोन्ही बाबतीत मागे पडलो. तरीही आम्ही बेस्ट वाचवण्यासाठी लढा दिला, पण पैशांच्या खेळात आम्हाला पराभव स्विकारावा लागला.”
निकालाचा सारांश-
२१ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत शशांक राव पॅनेलने १४ जागा मिळवत स्पष्ट आघाडी घेतली. महायुतीच्या सहकार समृद्धी पॅनेलने ७ जागा जिंकल्या. तर ठाकरे-मनसे युतीचं उत्कर्ष पॅनेल शून्यावर थांबलं. प्रतिष्ठेची मानली गेलेली ही निवडणूक ठाकरे गट आणि मनसेसाठी मोठा धक्का ठरली आहे.