नागपूर मनपा गणेशोत्सवासाठी सज्ज; आयुक्त डॉ. अभिजीत चौधरींकडून तयारींचा आढावा

    20-Aug-2025
Total Views |
 
Dr Abhijeet Chaudhary
 (Image Source-Internet)
नागपूर :
काही दिवसांत श्री गणेशाच्या आगमनाची मंगलधून सुरू होणार असून यंदाच्या गणेशोत्सवासाठी (Ganeshotsav) नागपूर महानगर पालिकेची यंत्रणा सज्ज आहे. मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी मंगळवारी विविध विभागांच्या तयारीचा आढावा घेतला. विशेषत: गणेश प्रतिमांच्या विसर्जनासाठी करण्यात आलेल्या व्यवस्थेची त्यांनी तपासणी केली. सार्वजनिक गणेश मंडळांना नियमांनुसार परवानगी तत्काळ द्यावी, असेही त्यांनी अधिकाऱ्यांना बजावले.
 
415 कृत्रिम तलावांची व्यवस्था-
शहरात एकूण 208 ठिकाणी 415 कृत्रिम तलाव तयार करण्यात येणार आहेत. तसेच चार फूटांपेक्षा मोठ्या मूर्तींसाठी गोरेवाडा, पोलीस लाईन टाकळी आणि कोराडी येथे विशेष सुविधा उभारण्यात येतील. या ठिकाणी सीसीटीव्ही, वीजपुरवठा आणि पिण्याच्या पाण्याची सोय करण्याचे निर्देश दिले आहेत. कृत्रिम तलाव पाण्याने भरण्यासाठी अतिरिक्त टँकर, निर्माल्य संकलनासाठी कलश, विसर्जन मार्गावरील झाडांच्या फांद्या छाटणे व रस्त्यातील खड्ड्यांची दुरुस्ती करण्याचाही आदेश देण्यात आला आहे.
 
एकल खिडकी पद्धत-
सार्वजनिक गणेश मंडळांना परवानगी मिळवताना त्रास होऊ नये, यासाठी प्रत्येक झोनमध्ये वन-स्टॉप विंडो प्रणाली कार्यान्वित केली जाणार आहे. याठिकाणी पोलिस आणि अग्निशमन दलाचे कर्मचारीही उपस्थित राहतील, जेणेकरून परवानगी प्रक्रियेत अडथळा येणार नाही.
 
मोबाइल विसर्जन कुंडांची सुविधा-
वृद्ध नागरिक आणि दूरवर जाणे शक्य नसलेल्या भक्तांसाठी चलित (मोबाइल) विसर्जन कुंड उपलब्ध करून देण्यात येतील. संबंधित व्यक्तींनी झोन कार्यालयात नोंदणी केल्यास त्यांच्याच घरासमोर विसर्जन कुंड पोहोचवण्यात येईल. त्यासोबतच शहरात 14 निर्माल्य रथ फिरवले जातील.
 
पर्यावरणपूरक विसर्जन-
गणेश मूर्तींचे विसर्जन कोणत्याही नैसर्गिक जलस्रोतांमध्ये न करता केवळ कृत्रिम तलावांमध्येच करण्यात येणार आहे. विसर्जन स्थळांवर प्रकाशयोजना, वैद्यकीय मदत, अग्निसुरक्षा व निर्माल्य संकलनाची सोय केली जाणार आहे. “सर्व व्यवस्था नीटनेटकी व सुरळीत व्हाव्यात,” असे निर्देश आयुक्त डॉ. चौधरी यांनी दिले आहेत.