(Image Source-Internet)
मुंबई :
कोळी समाजाच्या मेळाव्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सत्ताधाऱ्यांवर ताशेरे ओढले. "सत्तेवर बसलेल्यांची जुनीच सवय आहे – आधी आश्वासनं देऊन लोकांना भुलवायचं, आणि नंतर त्यांच्याच हक्कांवर गदा आणायची," अशा शब्दांत ठाकरे यांनी थेट हल्ला चढवला.
आधी दिलासा, मग फसवणूक–
ठाकरे म्हणाले, "हे सरकार सुरुवातीला लोकांच्या मागण्यांना मान्यता दिल्यासारखं भासवतं. पण ही सगळी एक प्रकारची साखर पेरणं असतं. लोकांचा आवाज थांबला की, हेच लोक हळूहळू त्यांचे हक्क हिरावून घेतात."
कोकाटे-भरणे यांच्यावर उपरोधाचा बाण-
कृषी खात्याच्या बदलावर भाष्य करताना ठाकरे म्हणाले, "आज पहिल्यांदाच कुणालातरी त्याचं आवडतं खातं मिळालं. आता 'रमी' या पत्त्यांच्या खेळालाही कायदेशीर मान्यता मिळणार का?" अशी उपरोधिक टिपणी करत त्यांनी सत्ताधाऱ्यांची खिल्ली उडवली.
कोळी समाजासाठी ठाम पाठिंबा-
"शिवसेना म्हणजे तुम्हीच. तुमच्या हक्कांवर गदा आली, तर शिवसेना गप्प बसणार नाही," असं सांगत ठाकरे यांनी कोळी समाजाला पाठिंबा जाहीर केला. त्यांनी असा आरोपही केला की, "सरकार केवळ घरभाडं भरण्याच्या घोषणा करतं, पण प्रत्यक्षात लाभार्थ्यांच्या खात्यात पैसेच पोहोचत नाहीत. मधेच कुणी तरी पैसे डसतो – हे वास्तव आहे."
मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळाची आठवण-
"कोरोनासारख्या गंभीर संकटात आम्ही शक्य तितकं काम केलं. जर आज आमचं सरकार असतं, तर तुम्हाला लढावं लागलं नसतं," असं सांगत ठाकरे यांनी आपला कार्यकाळही लोकांना आठवून दिला. "शिवसेना भूमिपुत्रांसाठी उभी राहिलीय आणि कायम राहील," असं ठाम आश्वासन त्यांनी दिलं.
उद्धव ठाकरेंच्या या भाषणातून केवळ सरकारविरोधी नाराजीच नव्हे, तर कोळी समाजाशी असलेली शिवसेनेची नाळ आणि निष्ठा पुन्हा अधोरेखित झाली.