– पुढील सात दिवस उष्णतेतच जाईल
(Image Source-Internet)
नागपूर :
गेल्या काही दिवसांपासून नागपूरसह संपूर्ण विदर्भात पावसाने (Rain) दडी मारल्याने उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. सतत ढगाळ हवामान असूनही पावसाचा मागमूस नाही. शनिवारी नागपूरमध्ये कमाल तापमान ३३.४ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले, जे सरासरीपेक्षा तब्बल २.६ अंशांनी अधिक आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, येत्या आठवडाभरातही पावसाची फारशी शक्यता नाही. वातावरणात दमटपणा आणि उष्णता वाढल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. विशेषतः दिवसभर असह्य गरम हवामान असल्याने घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे.
मान्सूनचा प्रभाव क्षीण –
बंगालच्या उपसागरात सध्या कोणताही ठोस कमी दाबाचा पट्टा तयार होत नसल्याने विदर्भात पावसात खंड पडलेला आहे. त्यासोबतच मान्सूनची मुख्य वारेरेषा हिमालयाच्या दिशेने सरकली आहे, ज्याचा परिणाम म्हणजे विदर्भात पावसाचे प्रमाण घटले आहे.
काही ठिकाणीच हलक्याफुलक्या सरी –
हवामान तज्ज्ञांच्या मते, या काळात काही भागांत स्थानिक ढगांच्या प्रभावामुळे थोड्याफार प्रमाणात सरींची शक्यता आहे. मात्र, मुसळधार पावसाचा काहीच अंदाज नाही. त्यामुळे पुढील सात दिवस उकाड्याचीच स्थिती राहण्याची शक्यता आहे.
शेतीसाठी संकट निर्माण होण्याची शक्यता –
पावसाच्या गैरहजेरीमुळे विदर्भातील शेतकरी वर्ग चिंतेत आहे. ऑगस्ट महिन्यातही अपेक्षित पर्जन्यमान कमी राहण्याचा अंदाज असल्याने खरीप हंगामावर त्याचा परिणाम होऊ शकतो. पेरण्या उशिराने झाल्या असल्यामुळे आणि नंतर पाणी कमी पडल्यामुळे पीकधोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.