- तीन दलाल गजाआड, सात पीडित महिलांची सुटका
(Image Source-Internet)
नागपूर:
नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने ‘ऑपरेशन शक्ती’ (Operation Shakti) अंतर्गत केलेल्या कारवाईत शहरातील दोन ठिकाणी सुरू असलेल्या देहव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या धडक मोहिमेत तीन दलालांना अटक करण्यात आली असून सात महिलांची सुटका करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या पैकी पाच महिलांना अवघ्या दोन दिवसांपूर्वी नागपुरात विमानाद्वारे आणल्याचे उघड झाले आहे.
पहिली कारवाई: नवीन कामठी येथील फार्महाऊसवर छापा-
पहिली छापेमारी नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अजनी गावातील Dwell Stays Cocktail Camel या फार्महाऊसवर करण्यात आली. पोलिसांनी बोगस ग्राहकाच्या माध्यमातून सापळा रचून एका महिलेचा व्यवहार १५०० रुपयांत ठरवला आणि खोलीत पोहोचताच तिला ताब्यात घेतले.
या ठिकाणी ६५ वर्षीय लता बेलेकर या महिला दलालासह व्यवस्थापक ईशान भोयर याला अटक करण्यात आली आहे. फार्महाऊसचा मालक अमोल मानवटकर हा पसार असून त्याचा शोध सुरू आहे. घटनास्थळी दोन महिलांची सुटका करण्यात आली असून त्या आर्थिक अडचणीमुळे या दलदलीत अडकल्या असल्याची माहिती आहे.
दुसरी कारवाई: गणेशपेठ परिसरात हॉटेलबाहेर जाळं-
दुसऱ्या कारवाईत क्राईम ब्रँचनं गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत Swag Stay Rahul हॉटेलजवळ छापा टाकला. येथे सुमित घाटे नावाच्या दलालाला अटक करण्यात आली असून तो वाहन चालक आहे. या ठिकाणी पाच महिलांची सुटका करण्यात आली आहे. त्यांना मुंबई व कोलकात्यातून नागपुरात बोलावण्यात आले होते.
‘नाईट आऊट’च्या नावाखाली ऑनलाइन व्यवहार करत महिलांचा सौदा केला जात होता. एका प्रकरणात तिघी महिलांसाठी २१,००० रुपयांचा व्यवहार झाला होता. पोलिसांनी बोगस ग्राहकाच्या मदतीने रस्त्यावरच या महिलांना ताब्यात घेतले आणि उर्वरित दोन महिलांनाही शोधून वाचवले.
या प्रकरणात राहुल आणि सचिन या दोघांनी महिलांना नागपुरात बोलावल्याची माहिती असून, ते सध्या फरार आहेत. सर्व आरोपी व पीडित महिलांना पुढील चौकशीसाठी गणेशपेठ पोलीस ठाण्यात हस्तांतरित करण्यात आले आहे.
ऑपरेशन शक्तीचा परिणाम — पोलिसांची वाढती कारवाई
या घटनांनंतर पोलिसांनी शहरातील ओयो हॉटेल्स, गेस्ट हाऊस आणि इतर व्यवसायिकांना नोटीस देत दक्षता बाळगण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र, अशा सूचनांनंतरही सेक्स रॅकेट सुरू असल्याचे समोर आल्याने पोलिस प्रशासन अधिक सतर्क झाले आहे.
ऑनलाइन माध्यमातून 'नाईट पार्टी'च्या नावाखाली चालणाऱ्या अशा अवैध धंद्याविरोधात नागपूर पोलिसांनी आता कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.