भारत जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर; पंतप्रधान मोदींचे विधान

02 Aug 2025 20:32:53
 
PM Modi
 (Image Source-Internet)
वाराणसी :
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेवर (Economy) टीका करत ती 'डेड इकॉनॉमी' म्हणजेच मृत अर्थव्यवस्था असल्याचं वक्तव्य केलं होतं. यावर प्रतिक्रिया देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीमधून ठाम विधान करत स्पष्ट केलं की, भारत आता जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर आहे.
 
पंतप्रधान मोदी म्हणाले, "देशातील प्रत्येक नागरिकाने आता ठरवायला हवं की आपण कोणतीही गोष्ट खरेदी करताना ‘देशहित’ हेच एकमेव मापदंड मानणार. स्वदेशी वस्तूंना प्राधान्य देणं ही काळाची गरज आहे."
 
मोदींनी सांगितलं की भारत यापुढे कोणतीही वस्तू खरेदी करताना केवळ एकच गोष्ट पाहील – ती वस्तू भारतीयांच्या कष्टातून, त्यांच्या घामातून तयार झाली आहे की नाही. "भारतीय हातांनी तयार केलेल्या गोष्टी हेच आमचं भविष्य घडवतील. स्वदेशी ही आता केवळ संकल्पना न राहता, देशहिताचं बळ आहे," असं ते म्हणाले.
 
जगभरातील अर्थव्यवस्थांवर अस्थिरतेचं सावट आहे, अशा परिस्थितीत भारत स्थैर्य आणि विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे. "शेतकरी, युवा, लघुउद्योग, रोजगार यांसारख्या क्षेत्रांना पुढे नेत आपण आत्मनिर्भर भारताच्या दिशेने काम करत आहोत," असं मोदींनी स्पष्ट केलं.
 
ते पुढे म्हणाले की, देशातील व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानांमध्ये स्वदेशी उत्पादने ठेवावीत आणि ग्राहकांनीही तीच वस्तू खरेदी करावी जी भारतात तयार झाली आहे. "हीच खरी देशसेवा आणि हीच खरी महात्मा गांधींना श्रद्धांजली असेल," असंही मोदी म्हणाले.
 
पंतप्रधान मोदींच्या या वक्तव्याला राजकीय संदर्भही लाभले असून, ट्रम्प यांच्या टीकेनंतर त्यांनी दिलेलं हे उत्तर आता चर्चेचा विषय बनलं आहे.
Powered By Sangraha 9.0