(Image Source-Internet)
नागपूर :
नागपूरच्या गोरेवाडा (Gorewada) आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयात घडलेल्या दुर्दैवी घटनेने एकच खळबळ उडवली आहे. बुधवारी रात्री झूच्या संरक्षित परिसरात अचानक एका जंगलातून आलेल्या नर बिबट्याने प्रवेश केला आणि पिंजऱ्यात असलेल्या मादी बिबट्यावर थेट हल्ला चढवला. या झुंजीत मादी बिबट्या गंभीर जखमी झाली आणि दोन दिवसांनी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
प्राप्त माहितीनुसार, नर बिबट्या मादीच्या वासामुळे किंवा आवाजामुळे पिंजऱ्यापर्यंत पोहोचला आणि त्यानंतर दोघांमध्ये भीषण झुंज झाली. मादीला वाचवण्यासाठी झू प्रशासनाने तत्काळ वैद्यकीय उपचार सुरू केले, मात्र अंतर्गत गंभीर जखमा झाल्यामुळे तिचा जीव वाचवता आला नाही. शवविच्छेदन अहवालातही तिच्या शरीरावर खोल जखमा आढळून आल्या आहेत.
ही घटना समोर आल्यानंतर प्राणी संग्रहालयातील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. याआधीही अशा प्रकारच्या घुसखोरीच्या घटना घडल्या असून प्रशासनाकडून नेहमीच उपाययोजनांचं आश्वासन दिलं जातं. मात्र, प्रत्यक्षात पुन्हा अशी दुर्घटना घडल्यामुळे झूच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
दरम्यान, वन विभाग आणि झू प्रशासनाने याप्रकरणी संयुक्त चौकशी सुरू केली असून झूच्या सीमारेषांवर वायर फेन्सिंग, सीसीटीव्ही कॅमेरे, सेन्सर आणि इतर इलेक्ट्रॉनिक यंत्रणा बसवण्याचे काम तातडीने सुरू केल्याची माहिती देण्यात आली आहे.
सध्या संपूर्ण गोरेवाडा झू परिसरात सतर्कता वाढवण्यात आली असून, भविष्यात अशा घटनांचा पुनरावृत्ती होऊ नये यासाठी काटेकोर उपाययोजना केल्या जातील, असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.