(Image Source-Internet)
सोलापूर :
राज्याच्या राजकीय रंगमंचावर सतत उलथापालथ घडताना दिसते आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते पक्ष बदल करत आहेत. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या सेनेला सोलापूर जिल्ह्यातून जोरदार धक्का बसला आहे. शिंदे गटाचे सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख आणि त्यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे शिवाजी सावंत यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. त्यांच्यासोबत इतर ११ प्रमुख पदाधिकाऱ्यांनीही आपल्या जबाबदाऱ्या सोडल्या आहेत.
शिवसेनेतील अंतर्गत असंतोष उफाळून आला-
मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजी सावंत यांच्या नेतृत्वात जिल्हा समन्वयक, उपजिल्हा प्रमुख तसेच काही तालुकाध्यक्ष अशा एकूण ११ पदाधिकाऱ्यांनी एकत्रितपणे आपल्या पदांचा राजीनामा दिला आहे. पुढील दोन-तीन दिवसांत नाराज नेत्यांची बैठक बोलावण्यात येणार असून, यामध्ये भविष्यातील राजकीय वाटचालीचा निर्णय घेतला जाणार आहे.
आम्ही नाराजी व्यक्त केली, पण कोणतीही दखल घेतली गेली नाही-
या संदर्भात बोलताना जिल्हा समन्वयक दिलीप कोल्हे आणि उपजिल्हा प्रमुख हरिभाऊ चौगुले यांनी स्पष्टपणे सांगितले की, "आम्ही वारंवार पक्षनेत्यांच्या निदर्शनास मुद्दे आणले. आमच्या तालुक्यांमध्ये लोकसभा संपर्कप्रमुख हस्तक्षेप करत होते. अधिकार नसताना पदाधिकाऱ्यांची नेमणूक केली जात होती. याबाबत मुख्यमंत्री शिंदेंना माहिती दिली, पण परिस्थितीत काहीच बदल झाला नाही. त्यामुळे आम्ही सामूहिक राजीनाम्याचा निर्णय घेतला."
आगामी निवडणुकांच्या तोंडावर शिंदे गट अडचणीत-
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याच्या उंबरठ्यावरच शिंदे गटाला असा मोठा झटका बसणे हे पक्षासाठी नक्कीच चिंतेचा विषय आहे. या निवडणुका स्थानिक पातळीवर लढवायच्या असल्याने तालुकास्तरावरील नेत्यांचे योगदान निर्णायक ठरते. सोलापुरात निर्माण झालेल्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे स्थान कमकुवत होण्याची शक्यता आहे.
आता शिंदे काय पावले उचलणार?
सोलापुरातील ही राजकीय फूट थांबवण्यासाठी आणि नाराज नेत्यांना पुन्हा गटात आणण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे कोणते धोरण आखतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. हा असंतोष केवळ सोलापुरापुरता मर्यादित राहतो की इतर जिल्ह्यांपर्यंत पोहोचतो, हेही लवकरच स्पष्ट होईल.