महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवरील विरोधकांचे आरोप फोल ठरले;सर्वोच्च न्यायालयाने दिला धक्का

19 Aug 2025 14:15:57
 
Supreme Court
 (Image Source-Internet)
मुंबई :
नोव्हेंबर 2024 मध्ये पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra assembly elections) मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याचा विरोधकांचा दावा न्यायालयात टिकला नाही. सर्वोच्च न्यायालयानेही सोमवारी ही याचिका फेटाळून लावत उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. त्यामुळे निवडणूक निकाल रद्द व्हावेत, अशी मागणी करणाऱ्यांना आणखी एक धक्का बसला आहे.
 
जून महिन्यात मुंबई उच्च न्यायालयाने ही याचिका ग्राह्य नसल्याचे ठरवत फेटाळून लावली होती. त्याविरोधात अपील सर्वोच्च न्यायालयात करण्यात आले. मात्र, सर्वोच्च न्यायालयानेही याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार देत, या तक्रारीत कोणताही कायदेशीर आधार नसल्याचे स्पष्ट केले.
 
याचिकेत असा आरोप करण्यात आला होता की, मतदानाच्या दिवशी संध्याकाळी सहानंतर तब्बल 72 लाख मतं अनियमित पद्धतीने नोंदवली गेली. त्यामुळे निवडणूक निकाल बाद व्हावा, अशी मागणी होती. परंतु, न्यायालयाने या दाव्याला वजन न देता अशा निराधार याचिकांवर दंड आकारण्याची वेळ येऊ शकते, असा इशारा दिला होता.
 
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही या मुद्द्यावरून सरकारवर हल्ला चढवला होता. प्रकाश आंबेडकर यांच्यासह इतर विरोधकांनी ईव्हीएममध्ये फेरफार झाल्याचा आरोप केला. मात्र, निवडणूक आयोगाने हे सर्व आरोप फेटाळत त्यांना दिशाभूल करणारे ठरवले.
 
याचिका दाखल करणारे नागरिक चंद्रकांत अहिर यांनी थेट न्यायालयात दाद मागितली होती. पण न्यायालयाने स्पष्ट केले की, निवडणूक रद्द करण्यासंबंधीची कारवाई प्रथम निवडणूक आयोगाकडेच करावी लागते. केवळ वृत्तपत्रातील बातमीच्या आधारे अशा तक्रारी करता येत नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले. उच्च न्यायालयाने तर टिप्पणी केली होती की, अशा याचिकांमुळे न्यायालयाचा मौल्यवान वेळ वाया जातो.
 
दरम्यान, काहींनी मतमोजणीत लाखो मतांचा फरक झाल्याचा दावा केला होता. तसेच, अल्पावधीतच कोट्यवधी नव्या मतदारांची भर पडल्याचेही विरोधकांनी सांगितले. पण आयोगाने हे सर्व दावे तथ्यहीन असल्याचे सांगत खोडून काढले.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करत विरोधकांचे आरोप निराधार असल्याचे स्पष्ट केले.
Powered By Sangraha 9.0