नवी मुंबईच्या धर्तीवर उभारला जाणार “नवा नागपूर”; काय आहे प्रकल्प?

    19-Aug-2025
Total Views |
 
New Nagpur
 (Image Source-Internet)
नागपूर :
वाढत्या शहरी दबावाला तोंड देत नागपूरचा सुनियोजित विकास साधण्यासाठी महाराष्ट्र सरकारने “नवा नागपूर” (New Nagpur) या महत्त्वाकांक्षी योजनेला हिरवा कंदील दाखवला आहे. ही संकल्पना नवी मुंबईच्या धर्तीवर राबवली जाणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
 
काय आहे “नवा नागपूर” प्रकल्प?
या योजनेअंतर्गत नागपूर महानगर क्षेत्रात एक आधुनिक उपग्रह नगर (Satellite Township) उभारले जाणार आहे. यात तिसरा (पेरिफेरल) रिंग रोड, ट्रक टर्मिनल, लॉजिस्टिक हब, आयटी हब आणि औद्योगिक पार्क यांचा समावेश असेल. उद्दिष्ट आहे की नागपूरला आगामी काळाच्या दृष्टीने एक स्मार्ट, हिरवीगार आणि नियोजनबद्ध शहर म्हणून विकसित करणे.
 
कोणते भाग येणार नव्या नागपूरमध्ये?
या प्रकल्पात नागपूर ग्रामीण, कामठी, हिंगणा, पारसेनी, मौदा, सावनेर, उमरेड आणि कालमेश्वर या तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. नव्या मसुदा विकास आराखड्यात (Draft DP) हुडकेश्वर आणि नरशाळा यांनाही जोडले गेले आहे. मात्र, भरतवाडा, पुणापूर, पारडी आणि भंडेवाडी हे काही भाग या योजनेतून वगळले आहेत.
 
१४८ किमी लांबीचा तिसरा रिंग रोड-
या योजनेचा कणा ठरणार आहे १४८ किलोमीटर लांबीचा तिसरा रिंग रोड. यासाठी ३६ गावांतील तब्बल ८८० हेक्टर जमीन अधिग्रहित केली जाणार आहे. हा रिंग रोड बुटीबोरी MIDC, हिंगणा औद्योगिक क्षेत्र, MIHAN, कलमेश्वर, गोंडखैरी, कामठी, पारसेनी, मौदा, उमरेड, हुडकेश्वर आणि नरशाळा या पट्ट्यातून जाणार आहे. तसेच तो NH-44, NH-53 आणि NH-47 या राष्ट्रीय महामार्गांशी जोडला जाणार असल्याने नागपूर मोठ्या औद्योगिक व लॉजिस्टिक हब म्हणून उदयास येईल.
 
अत्याधुनिक ट्रक टर्मिनल-
शहराच्या बाहेरील भागात एक आधुनिक ट्रक टर्मिनल उभारले जाणार आहे. यात मोठा पार्किंग एरिया, लोडिंग-अनलोडिंग झोन, गोदाम, कोल्ड स्टोरेज, दुरुस्ती-सर्व्हिस सेंटर आणि चालकांसाठी विश्रांतीगृह यांसारख्या सुविधा उपलब्ध असतील. यामुळे शहरातील ट्रॅफिक जाम आणि प्रदूषणाची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होईल.
 
भविष्याची दिशा-
तज्ज्ञांच्या मते, “नवा नागपूर” ही केवळ शहराची वाढ नाही तर सुनियोजित शहरी विकासाची एक नवी दिशा आहे. या प्रकल्पामुळे केवळ जुन्या नागपूरवरील ताण कमी होणार नाही, तर रोजगारनिर्मिती, उद्योगविकास आणि आर्थिक व्यवहारांचे एक नवीन केंद्र उभे राहणार आहे.