नांदेडमध्ये मुसळधार पावसाचा कहर; आठ जणांचा बळी

19 Aug 2025 18:09:05
- मुखेड तालुक्यातील गावांना पुराचा वेढा, जनजीवन ठप्प

Heavy rains Nanded(Image Source-Internet) 
नांदेड :
नांदेड (Nanded) जिल्ह्यात सोमवारी मध्यरात्रीनंतर सुरू झालेल्या मुसळधार पावसाने भीषण संकट ओढवले. लेंढी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात कोसळलेल्या या पावसामुळे ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. आठ नागरिकांचा मृत्यू झाला असून, मुखेड तालुक्यातील रावणगाव, हसनाळ, भासवाडी, वडगाव आणि भेंडेगाव या गावांना पुराचा फेरा बसला. अनेक घरे पाण्याखाली गेल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली.
 
आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने तातडीने मदतकार्य सुरू करत 300 पेक्षा जास्त लोकांना सुरक्षित स्थळी हलवले. अनेकांना बोटींच्या साहाय्याने वाचवावे लागले, तर सैन्यदलालाही मदतीसाठी पाचारण करण्यात आले. तरीदेखील, गावकऱ्यांचे म्हणणे आहे की, मदत पोहोचण्यात उशीर झाला.
 
दरम्यान, मुखेडचे आमदार तुषार राठोड तब्बल 24 तासांनी गावात दाखल झाल्याने संतापलेल्या नागरिकांनी प्रश्नांचा भडिमार केला. पूरस्थिती भयावह असताना आमदार कुठे होते, असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.
 
पूरामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हसनाळमधील एका किराणा दुकानातील सर्व साहित्य तसेच घरगुती धान्यसाठा आणि महत्त्वाची कागदपत्रे पाण्यात भिजून गेल्याची उदाहरणे समोर आली आहेत. एका रात्रीच्या मुसळधार पावसाने अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त केले आहेत.
 
प्रशासनाकडून सांगण्यात आले की लेंढी धरण क्षेत्रात 30 टक्के पाणीसाठा करण्याचा विचार होता, मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात पूर कसा आला, याची सिंचन विभागाकडून चौकशी होणार आहे. दक्षिणेकडील धरणांतून सुरू असलेल्या विसर्गामुळे पाणीपातळी कमी होण्यास मदत होत असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले.
Powered By Sangraha 9.0