मुंबईत पावसाचा तडाखा; ‘बिग बॉस 19’च्या मीडिया इव्हेंटला स्थगिती

19 Aug 2025 20:02:26
 
Bigg Boss 19
 (Image Source-Internet)
मुंबई :
मुसळधार पावसामुळे (Heavy rains) मुंबईचं जनजीवन विस्कळीत झालं असून, वाहतूक व्यवस्थेसह मनोरंजन क्षेत्रालाही त्याचा फटका बसला आहे. प्रेक्षकांच्या उत्सुकतेचं केंद्र असलेल्या ‘बिग बॉस 19’च्या घराचं मीडिया दर्शन मंगळवारी आयोजित करण्यात आलं होतं. मात्र, शहरात ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे जिओ हॉटस्टारने हा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला.
 
हॉटस्टार टीमने निवेदन जारी करताना म्हटलं, “मुंबईतील मुसळधार पावसामुळे बिग बॉसचं घर माध्यमांना दाखवण्याचा कार्यक्रम आणि त्यासंबंधित सर्व उपक्रम सध्या थांबवण्यात आले आहेत. गैरसोयीबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. हवामान सुधारल्यानंतर पुढील तारीख जाहीर करू.”
 
सूत्रांच्या माहितीनुसार, या कार्यक्रमासाठी दिल्लीसह देशभरातून आलेल्या पत्रकारांना सुरक्षिततेच्या कारणास्तव परतीचा मार्ग दाखवण्यात आला. मुंबईत आधीच पोहोचलेल्या प्रतिनिधींनाही अनावश्यक अडचणी टाळण्यासाठी परत पाठवण्यात आलं. दरम्यान, खराब हवामानामुळे विमान उड्डाणांमध्येही उशीर व रद्दबातल करण्याची वेळ आली आहे.
 
फिल्म सिटीमध्ये पाणी साचल्याने ‘बिग बॉस’चं घर मीडिया प्रतिनिधींना दाखवण्याचा कार्यक्रम रद्द झाला असला, तरी इतर मालिका व चित्रपटांचे शूटिंग सावधगिरीने सुरू आहेत.
 
दरम्यान, ‘बिग बॉस 19’चा प्रीमिअर 24 ऑगस्ट रोजी होणार आहे. सूत्रसंचालक सलमान खान याने याआधीच या सिझनच्या राजकीय थीमविषयी संकेत दिले होते. या शोची प्रचंड लोकप्रियता लक्षात घेऊन यंदा सलमानने मानधन वाढवलं असून, वृत्तानुसार त्याला सुमारे 300 कोटी रुपये फी मिळत आहे.
Powered By Sangraha 9.0