शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या; कर्ज काढून सहाय्य करा; विजय वडेट्टीवार यांची मागणी

18 Aug 2025 15:42:06
 
Vijay Wadettiwar
 (Image Source-Internet)
नागपूर :
मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वर्धा व पैनगंगा नद्या पुरामुळे खचाखच भरून वाहत आहेत. त्यामुळे ज्वारी, कापूस, सोयाबीन यांसारखी हंगामी पिकं पाण्याखाली गेली असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस विधानमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी सरकारला तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे.
 
शेतकऱ्यांची स्थिती गंभीर –
अकोला, यवतमाळ, वाशीम व बुलढाणा जिल्ह्यांतील हजारो एकर शेती पावसाच्या तडाख्यामुळे उद्ध्वस्त झाली आहे. शेतकरी निराश झाले असून आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभे आहेत, असे वडेट्टीवार यांनी सांगितले. त्यांनी सरकारवर टीका करताना म्हटले की, "मागील अतिवृष्टीतील नुकसानभरपाईचे पैसे अजूनही शेतकऱ्यांच्या हाती पोहोचलेले नाहीत आणि आता पुन्हा पिकं बुडाली आहेत. सरकारने इतर कारणांसाठी कर्ज काढले आहे, तर शेतकऱ्यांना मदत करण्यासाठीही तातडीने कर्ज काढावे आणि मदत द्यावी."
 
शिवभोजन थाळी योजनेवरही प्रश्नचिन्ह –
सरकार गरीबांसाठी सुरू केलेल्या योजनांकडे दुर्लक्ष करत आहे, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला. शिवभोजन थाळी योजनेसाठी गेल्या सात महिन्यांपासून निधी दिला गेला नाही, त्यामुळे ही योजना बंद करण्याचा सरकारचा विचार आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. "जे कामगार या योजनेत काम करतात, त्यांना मानधन मिळत नाही; मग सरकार त्यांच्या आत्महत्येची वाट पाहते आहे का?" असा सवाल त्यांनी केला.
 
राज्याचा कोष रिकामा –
नागपूरमधील पत्रकार परिषदेत बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, "राज्याचा खजिना रिकामा झाला आहे. ठेकेदारांचे पैसे अडकले आहेत, आमदारांना निधी मिळत नाही, मात्र आधार नसलेल्या योजना सुरू आहेत. अशा परिस्थितीत शेतकरी, गरीब आणि सर्वसामान्य जनता धोक्यात आहे," अशी कडवी टीका त्यांनी राज्य सरकारवर केली.
Powered By Sangraha 9.0