तेजस्विनी पंडित यांच्या आई व ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे निधन; कलाविश्वात शोककळा

18 Aug 2025 15:15:08
 
veteran actress Jyoti Chandekar
 (Image Source-Internet)
पुणे :
मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील अनुभवी अभिनेत्री ज्योती चांदेकर (Jyoti Chandekar) यांचे १६ ऑगस्ट रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. दुसऱ्या दिवशी म्हणजे १७ ऑगस्ट रोजी पुण्यात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांना श्रद्धांजली वाहिली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही उपस्थित राहून ज्योती चांदेकर यांना शेवटचा निरोप दिला. कन्या तेजस्विनी पंडित हिने आईला मुखाग्नी देताना अश्रूंना वाट मोकळी करून दिली आणि वातावरण अधिकच शोकमग्न झाले.
 
सोशल मीडियावरील भावनिक आठवण-
आईच्या निधनानंतर तेजस्विनीने इन्स्टाग्रामवर एक हृदयस्पर्शी पोस्ट शेअर केली आहे. “मी सिंधुताई सपकाळ” या गाजलेल्या चित्रपटाचा उल्लेख करत तिने लिहिले – “ज्योती बेटा.. आता तिकडे माईची हुबेहूब भूमिका कोण साकारणार बरं?” या पोस्टसोबत आईचा फोटोही शेअर करत तिने दुःख व्यक्त केले. नेटकऱ्यांनीही तिच्या दुःखात सहभागी होत श्रद्धांजली अर्पण केली.
 
अभिनय कारकिर्द-
ज्योती चांदेकर यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात हिंदी चित्रपट ‘एक नजर’ (अमिताभ बच्चन अभिनित) मधून केली होती. त्यानंतर त्यांनी मराठी रंगभूमीकडे वळत ‘सुंदर मी होणार’, ‘करायला गेलो एक’, ‘वऱ्हाडी माणसं’, ‘स्वयंसिद्धा’ यांसारख्या नाटकांतून प्रेक्षकांची मने जिंकली. विशेषतः ‘मित्र’ या नाटकातील त्यांची भूमिका त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वपूर्ण टप्पा ठरली. या नाटकात त्यांनी दिग्गज अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांच्यासोबत काम केले होते.
 
चित्रपटसृष्टीतील योगदान-
नाटकांसोबतच त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीतही दमदार भूमिका केल्या. ‘मी सिंधुताई सपकाळ’, ‘पाऊलवाट’, ‘सुखान्त’, ‘गुरू’, ‘ढोलकी’, ‘तिचा उंबरठा’, ‘दमलेल्या बाबाची कहाणी’, ‘सलाम’ या चित्रपटांतून त्यांनी प्रभावी कामगिरी केली. विशेषतः “मी सिंधुताई सपकाळ” मधील त्यांची भूमिका आजही प्रेक्षक विसरू शकलेले नाहीत.
 
कलाविश्वाची हानी-
ज्योती चांदेकर यांच्या जाण्याने मराठी रंगभूमी व चित्रपटसृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. सहकलाकार आणि चाहत्यांनी त्यांना एक संवेदनशील, समर्थ आणि वास्तववादी अभिनेत्री म्हणून आठवत श्रद्धांजली अर्पण केली.
Powered By Sangraha 9.0