नागपूर महानगरपालिका निवडणूक : २२ ऑगस्टला नवा प्रभाग आराखडा होणार जाहीर

18 Aug 2025 14:46:26
- २८ ऑगस्टपर्यंत नागरिकांना हरकती नोंदवण्याची संधी

NMC(Image Source-Internet)  
नागपूर :
नागपूर महानगरपालिका निवडणुकीपूर्वी (Nagpur NMC elections) प्रभाग रचनेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महापालिकेने तयार केलेला आराखडा नगरविकास विभागाकडे सुपूर्द करण्यात आला असून, तो २२ ऑगस्ट रोजी सार्वजनिक केला जाणार आहे. नागरिकांना २८ ऑगस्टपर्यंत या रचनेवर हरकती व सूचना सादर करण्याची संधी दिली जाणार आहे.
 
या नव्या प्रभाग रचनेमुळे वार्डांची संख्या आणि सीमांकनात फेरबदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक महिन्यांपासून निवडणूक तयारीत गुंतलेल्या उमेदवारांची धावपळ वाढली असून, त्यांच्या राजकीय भविष्यावर अनिश्चिततेचे सावट आले आहे.
 
सत्ताधारी भाजपने आगामी निवडणुकीसाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. संघटनात्मक पातळीवर बैठका घेतल्या जात आहेत, कार्यकर्त्यांना सक्रिय राहण्याचे निर्देश दिले जात आहेत. महाविकास आघाडीतील पक्षही आपापले समीकरण नीट बसविण्याच्या तयारीत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, अंतिम आराखडा जाहीर झाल्यानंतर अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
 
दरम्यान, शहरातील विविध गट आणि प्रभावशाली नेते परस्परांशी समझोता करून एकत्रित लढण्याच्या चर्चेत आहेत. प्रत्येक प्रभागात राजकीय बैठका, कार्यक्रम आणि कार्यकर्त्यांचे हालचालींमुळे निवडणुकीचे वातावरण रंगू लागले आहे.
Powered By Sangraha 9.0