(Image Source-Internet)
नवी दिल्ली :
देशातील मोबाईल युजर्ससाठी पुन्हा एकदा अप्रिय बातमी समोर येत आहे. एअरटेल (Airtel), जिओ आणि व्होडाफोन आयडिया या आघाडीच्या टेलिकॉम कंपन्या लवकरच रिचार्ज प्लॅनचे दर वाढवण्याची शक्यता आहे. आधीच महागाईमुळे त्रस्त असलेल्या ग्राहकांना या निर्णयाचा थेट आर्थिक फटका बसणार आहे.
वार्षिक दरवाढीचा क्रम कायम-
गेल्या काही वर्षांपासून टेलिकॉम कंपन्यांकडून दरवर्षी सुमारे 20% वाढ केली जाते. यंदाही त्याच पद्धतीने किंमती वाढू शकतात, असे संकेत मिळत आहेत. विशेषतः 300 पेक्षा जास्त किंमतीचे प्लॅन महाग होण्याची शक्यता जास्त आहे, तर कमी दरातील बेसिक पॅक तुलनेने स्थिर ठेवले जाऊ शकतात. कारण, कमी दरातील ग्राहकांना गमावण्याचा धोका कंपन्यांना टाळायचा आहे.
वर्षाअखेरीस 10-12% वाढ होण्याची शक्यता-
ईटी टेलिकॉमच्या अहवालानुसार, डिसेंबर 2025 पर्यंत मोबाईल टॅरिफमध्ये 10 ते 12 टक्क्यांची वाढ होऊ शकते. जरी कंपन्यांनी अद्याप अधिकृत घोषणा केलेली नसली तरी युजर्समध्ये या संभाव्य वाढीबद्दल चिंता वाढली आहे. दोन सिम कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना सर्वाधिक फटका बसणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
गेल्या वर्षी जुलै 2024 मध्येच कंपन्यांनी 11% ते 23% इतकी मोठी वाढ केली होती. जर यावर्षी पुन्हा 12% वाढ झाली, तर ₹100 चा प्लॅन 112 पर्यंत महागणार आहे. लहानशी वाटणारी ही वाढ वारंवार रिचार्ज करणाऱ्या युजर्सच्या वार्षिक खर्चात मोठा फरक घडवून आणेल.
ग्राहकसंख्या वाढली; महसूल वाढवण्यावर भर-
मे 2025 मध्ये टेलिकॉम क्षेत्रात तब्बल 74 लाख नवीन सक्रिय युजर्सची भर पडली. गेल्या दोन वर्षांतील ही सर्वात मोठी वाढ आहे. सध्या देशातील अॅक्टिव्ह मोबाईल युजर्सची संख्या 1.08 अब्जवर पोहोचली आहे.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ग्राहकसंख्या झपाट्याने वाढत असली तरी स्वस्त प्लॅनमधून मोठा महसूल मिळत नाही. त्यामुळे कंपन्या आता मध्यम व उच्च श्रेणीतील रिचार्ज प्लॅनवर दरवाढ करून महसूल वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातून 5G नेटवर्क विस्तार, स्पेक्ट्रम फी आणि ऑपरेशनल खर्च भागवले जातात.