(Image Source-Internet)
मुंबई :
नांदेडमध्ये मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मुद्द्यावर पुन्हा एकदा आक्रमक होत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला थेट इशारा दिला आहे. "कोणाचा बापही आडवा आला तरी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळवूनच राहणार," अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी आंदोलनाची पुढची दिशा जाहीर केली. येत्या २९ ऑगस्ट रोजी मुंबईत होणारा मोर्चा हा अंतिम निर्णायक लढा ठरेल, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
जरांगे पाटील सध्या नांदेड दौऱ्यावर असून, त्यांनी मराठा समाजाच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना मोर्च्याचे महत्त्व अधोरेखित केले. "आता आंदोलन हे केवळ घोषणा देण्यापुरते राहू दिले जाणार नाही. हा शेवटचा लढा आहे. प्रत्येक मराठ्याने रस्त्यावर उतरलेच पाहिजे," असे ते म्हणाले. त्यांच्या वक्तव्यातील ठामपणा आणि आत्मविश्वासामुळे उपस्थितांमध्ये नवा उत्साह संचारला.
आतापर्यंत झालेल्या आंदोलनांपेक्षा यंदाचा मोर्चा अधिक व्यापक आणि निर्णायक असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. समाजाच्या हक्कासाठी हे निर्णायक पाऊल असून, ओबीसी प्रवर्गातून टिकून राहणारे आरक्षण मिळेपर्यंत झुकणार नाही, अशी त्यांची भूमिका स्पष्ट आहे. यावेळी त्यांनी कोणताही मोठा नेता, घराणेशाहीतला व्यक्ती किंवा सत्ताधारी आडवा आला तरी त्याला न जुमानण्याचा इशाराही दिला.
दरम्यान, सलग दौरे, सभा आणि बैठकीमुळे त्यांच्या प्रकृतीवर परिणाम झाल्याचे समोर आले आहे. नांदेडमधील कार्यक्रमादरम्यान त्यांना थकवा आणि अस्वस्थता जाणवल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तत्काळ तपासणी केली. डॉक्टरांनी त्यांना सध्या विश्रांती घेण्याचा सल्ला दिला असून, ते सध्या शासकीय विश्रामगृहात थांबले आहेत.
राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणाचा विषय सतत चर्चेचा केंद्रबिंदू राहिला आहे. मात्र आता २९ ऑगस्टचा मोर्चा या संघर्षाचा निर्णायक टप्पा ठरेल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे. त्यांचा रोखठोक आणि न डगमगणारा पवित्रा पाहता, हे आंदोलन सरकारपुढे मोठं आव्हान ठरू शकतं.