नागपुरातील दाभा परिसरात बिबट्याचा धुमाकूळ; कुत्र्यावर हल्ल्याची माहिती

16 Aug 2025 21:12:53
- स्थानीय नागरिकांमध्ये भीती आणि असुरक्षिततेचं वातावरण

Leopard attack (Image Source-Internet) 
नागपूर :
शहरातील दाभा (Dabha) भागात बिबट्याचा वावर दिवसेंदिवस वाढत असून, नागरिकांमध्ये भीतीचं सावट गडद होत चाललं आहे. गुरुवारी रात्री दीडच्या सुमारास संपत हाउसिंग सोसायटी परिसरात बिबट्याने कुत्र्यावर हल्ला करत त्याचा शिकार केल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
 
निवासींनी दिलेल्या माहितीनुसार, हा पहिलाच प्रकार नाही. मागील पंधरा दिवसांपासून बिबट्याने अनेकदा परिसरात हजेरी लावत कुत्र्यांना लक्ष्य केलं आहे. दर दोन-तीन दिवसांमध्ये अशीच घटना घडत असल्याचं सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी बिबट्या आपल्या दोन बछड्यांसह फिरताना देखील दिसला होता.
 
या घटना वारंवार घडत असतानाही वन विभागाकडून ठोस पावलं उचलण्यात आलेली नाहीत, अशी स्थानिकांची तक्रार आहे. बिबट्याचे हालचाल सुरूच राहिल्यास भविष्यात माणसांवरही धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत.
 
परिसरातील लोकांमध्ये आता भीतीचं वातावरण अधिकच गडद झालं असून, संध्याकाळनंतर कोणीही घराबाहेर पडण्यास टाळाटाळ करत आहे. नागरिकांनी वन विभागाकडे तातडीने कारवाईची मागणी करत पिंजरा लावून बिबट्याला पकडण्याचं आवाहन केलं आहे. योग्य त्या उपाययोजना न झाल्यास मोठा अनर्थ ओढवू शकतो, अशी स्पष्ट चेतावणी दिली जात आहे.
Powered By Sangraha 9.0