स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांचा इतिहास... ७९वा उत्सव जल्लोषात साजरा!

15 Aug 2025 13:03:54
 
Independence day
 (Image Source-Internet)
नवी दिल्ली:
भारतीय इतिहासातील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे १५ ऑगस्ट. सन १९४७ रोजी याच दिवशी भारताने ब्रिटीश सत्तेच्या २०० वर्षांच्या बेड्या तोडून स्वातंत्र्याचा श्वास घेतला. तेव्हापासून दरवर्षी हा दिवस अभिमान, कृतज्ञता आणि देशभक्तीच्या भावनांनी साजरा केला जातो. यंदा देश ७९वा स्वातंत्र्यदिन (Independence day) साजरा करीत असून स्वातंत्र्याला ७८ वर्षे पूर्ण झाली आहेत.
 
गोंधळाची उकल — ७८ की ७९?
सोशल मीडियावर नेहमीच चर्चा होते की, यंदा ७८वा स्वातंत्र्यदिन आहे की ७९वा. याचे उत्तर सोपे आहे — मोजणी करताना १९४७ चा पहिला स्वातंत्र्यदिन हा पहिला क्रमांक धरला जातो.
 
१९४७ — १ला स्वातंत्र्यदिन
१९५६ — १०वा
१९९६ — ५०वा
२०२१ — ७५वा
त्याच हिशोबाने २०२५ हा ७९वा स्वातंत्र्यदिन आहे, तर स्वातंत्र्याचा हा ७८वा वर्धापनदिन आहे. हे अगदी वाढदिवसासारखे आहे — जन्माचा दिवस हा पहिला दिवस, आणि पहिला वाढदिवस एक वर्षानंतर.
 
लाल किल्ल्यावरील भव्य सोहळा-
या दिवशीचा मुख्य कार्यक्रम दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्यावर झाला. पंतप्रधान तिरंगा फडकावतात, २१ तोफांची सलामी दिली गेली. राष्ट्रगीताचे स्वर दुमदुमतात आणि पंतप्रधान यांनी देशाला संबोधित केले. भाषणात मागील वर्षातील यश, आगामी योजनांची घोषणा आणि राष्ट्रीय विकासाची माहिती देण्यात आली
 
देशभर देशभक्तीचा जल्लोष-
शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये, रस्ते आणि गल्लीबोळ तिरंग्याच्या रंगांनी उजळून निघतात. सांस्कृतिक कार्यक्रम, प्रभातफेर्या, देशभक्तीपर गीते आणि विविध उपक्रमांतून प्रत्येक नागरिक हा दिवस स्मरणात ठेवतो.
 
७८ वर्षांच्या प्रवासात भारताने लोकशाही, तंत्रज्ञान, संरक्षण, क्रीडा आणि सामाजिक विकासात मोठी झेप घेतली आहे. आता ७९व्या स्वातंत्र्यदिनी, भारताचा प्रत्येक नागरिक अधिक सक्षम, समृद्ध आणि एकसंध राष्ट्र घडवण्याचा संकल्प करीत आहे.
Powered By Sangraha 9.0