PhonePe, Google Pay, Paytm वापरकर्त्यांसाठी महत्त्वाचा बदल; 1 ऑक्टोबरपासून ‘कलेक्ट रिक्वेस्ट’ सुविधा बंद

14 Aug 2025 15:48:29
 
Collect Request facility
 (Image Source-Internet)
मुंबई :
UPI चा वापर करून व्यवहार करणाऱ्यांसाठी लवकरच मोठा बदल होणार आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने फसवणूक रोखण्यासाठी आणि व्यवहारांची सुरक्षितता वाढवण्यासाठी ‘पर्सन टू पर्सन (P2P) कलेक्ट रिक्वेस्ट’ (Collect Request) ही सुविधा 1 ऑक्टोबर 2025 पासून पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
 
ही सुविधा वापरून कोणीही दुसऱ्या व्यक्तीकडून UPI द्वारे पैसे मागू शकत होते. मूळ उद्देश मित्रांकडून उधारी वसूल करणे, बिले वाटून भरणे अशा सोप्या व्यवहारांसाठी होता. पण, कालांतराने या फीचरचा गैरवापर सुरू झाला आणि अनेकांना बनावट मागण्यांच्या जाळ्यात अडकवून पैसे लुटले गेले.
 
NPCI ने स्पष्ट केले की, काही फसवणूक करणारे खोटी ओळख वापरून ‘कलेक्ट रिक्वेस्ट’ पाठवतात आणि यूझरने ती विचार न करता स्वीकारल्यास त्याच्या खात्यातून तत्काळ पैसे वजा होतात. 29 जुलैला जारी केलेल्या सर्कुलरनुसार, 1 ऑक्टोबरपासून सर्व बँका आणि UPI अॅप्सनी अशा विनंत्या स्वीकारणे किंवा प्रक्रिया करणे थांबवणे आवश्यक आहे.
 
अलीकडे या फसवणुकीत घट झाली असली तरी, त्याचे कारण 2,000 ची व्यवहार मर्यादा होती. मात्र, आता फीचरच हटवल्याने अशा प्रकारच्या फसवणुकीचा धोका पूर्णपणे दूर होईल, असा NPCI चा विश्वास आहे.
 
नवीन नियमांनुसार, 1 ऑक्टोबरनंतर UPI पेमेंट करण्यासाठी फक्त QR कोड स्कॅन करणे किंवा थेट संपर्क निवडून UPI पिन टाकणे हा एकमेव मार्ग असेल. यामुळे नकळत मंजूर होणारे व्यवहार टाळले जातील. व्यापाऱ्यांसाठी मात्र ही मर्यादा लागू नसेल, त्यामुळे फ्लिपकार्ट, अमेझॉन, स्विगी, झोमॅटो, आयआरसीटीसी यांसारख्या सेवा ग्राहकांना चेकआउट प्रक्रियेदरम्यान ‘कलेक्ट रिक्वेस्ट’ पाठवू शकतील.
 
NPCI ने सर्व बँका आणि UPI अॅप्सना अंतिम मुदतीपूर्वी तांत्रिक बदल पूर्ण करून ग्राहकांना नव्या प्रक्रियेबाबत माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे UPI वापरणाऱ्यांनी आतापासूनच आपल्या व्यवहार पद्धतीत बदल करण्याची तयारी ठेवावी.
Powered By Sangraha 9.0