क्रिकेटर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन याचा सानिया चंडोकसोबत साखरपुडा!

14 Aug 2025 15:42:08

Sachin Tendulkar son Arjun(Image Source-Internet) 
मुंबई:
क्रिकेट जगतातील दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर अलीकडेच विवाहबंधनाकडे पहिले पाऊल टाकत साखरपुड्याच्या सोहळ्यात सहभागी झाला. १३ ऑगस्ट रोजी मुंबईतील खास आणि निवडक पाहुण्यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात अर्जुनची बालपणीची मैत्रीण सानिया चंडोक हिच्यासोबत त्याचा साखरपुडा पार पडला. तेंडुलकर आणि चंडोक कुटुंबीयांनी अधिकृतरीत्या याची घोषणा केलेली नसली, तरी या घटनेने सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे.
 
२५ वर्षीय अर्जुनने वडिलांच्या तुलनेत थोड्याशा उशिरा लग्नाचा निर्णय घेतला असला, तरी दोघांच्या प्रेमकथेने चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे. सचिन तेंडुलकर यांनी वयाच्या २२ व्या वर्षी अंजली मेहताशी विवाह केला होता.
 
सानिया चंडोक, उद्योजक घराण्यातील तरुण व्यावसायिका-
सानिया ही नामांकित उद्योजक रवी घई यांची नात आहे. घई कुटुंब हॉटेल व खाद्य व्यवसायासाठी प्रसिद्ध असून, इंटरकॉन्टिनेंटल हॉटेल आणि ब्रुकलिन क्रीमरी हे त्यांचे प्रमुख ब्रँड आहेत.
 
सानियाचे शिक्षण मुंबईतील कॅथेड्रल अँड जॉन कॅनन स्कूल येथे झाले. पुढील शिक्षणासाठी ती लंडनला गेली आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून बिझनेस मॅनेजमेंटची पदवी मिळवली. २०२० मध्ये ती भारतात परतली आणि आपल्या प्राणीप्रेमाला व्यवसायात रुपांतरित करत मिस्टर पॉज हा प्रीमियम पेट सलून सुरु केला. वरळीतील या सलूनला श्रीमंत ग्राहकवर्ग आणि सेलिब्रिटींकडून चांगला प्रतिसाद मिळतो.
 
तिने पशुवैद्यकीय तंत्रज्ञाची पदवीही घेतली असून, तिच्या व्यवसायाच्या सोशल मीडिया पेजला सुमारे ३,७५० फॉलोअर्स आहेत. अर्जुन आणि त्याची बहीण सारा तेंडुलकर दोघेही हे पेज फॉलो करतात.
 
लंडनमध्ये सुरू झालेली जवळीक-
सानिया ही सारा तेंडुलकरची जिवलग मैत्रीण आहे. दोघींनी लंडनमध्ये शिक्षण घेत असताना अर्जुन तिथे क्रिकेट प्रशिक्षण घेत होता. याच काळात त्यांची ओळख वाढली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.
 
हा साखरपुडा त्यांच्या नात्याच्या नव्या पर्वाची सुरुवात ठरत असून, पुढील काळात विवाहाची तारीख जाहीर होण्याची अपेक्षा आहे. तेंडुलकर कुटुंबासाठी हा आनंदाचा क्षण असून, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
Powered By Sangraha 9.0