जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये ढगफुटीचा कहर; पूराच्या पाण्यात 10 जणांचे बळी

14 Aug 2025 19:06:55
 
Cloudburst
 (Image Source-Internet)
किश्तवाड:
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात गुरुवारी पहाटे चाशोटी भागात अचानक ढगफुटी (Cloudburst) होऊन भीषण पूर आला. पाण्याच्या प्रचंड लोंढ्यांमध्ये 10 जणांचा मृत्यू झाला असून, मोठ्या प्रमाणावर जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक घरांचे नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त होत असून, मदत व शोधमोहीम सुरू आहे.
 
घटनेची माहिती मिळताच पोलीस, एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि सैन्याचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. उपायुक्त पंकज शर्मा यांनी सांगितले की, "पूरग्रस्तांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे आणि तातडीची मदत पुरविण्याचे काम सुरू आहे."
 
उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले असून, मृतांच्या कुटुंबियांना संवेदना व्यक्त केल्या आहेत. तसेच, सर्व संबंधित यंत्रणांना बचावकार्य वेगाने पार पाडण्याचे आदेश दिले आहेत.
 
दरम्यान, श्रीनगर हवामान केंद्राने इशारा दिला आहे की पुढील काही तासांत जम्मू-काश्मीरच्या अनेक भागांत मुसळधार पाऊस, मेघगर्जना, ढगफुटी, अचानक पूर व भूस्खलनाची शक्यता आहे. कुपवाडा, बारामुल्ला, बांदीपोरा, श्रीनगर, गंदरबल, बडगाम, पूंछ, राजौरी, रियासी, उधमपूर, डोडा, किश्तवाड आणि काझीगुंड-बनिहाल-रामबन परिसरात विशेष दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
 
तसेच, वुलर तलाव, दाल तलाव आणि इतर जलाशयांवरील बोटिंग व शिकारा सेवेवर हवामान बिघडल्यामुळे तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे.
Powered By Sangraha 9.0