(Image Source-Internet)
मुंबई:
विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीतील नेत्यांचे महायुतीकडे जाण्याचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. शिवसेना शिंदे गट, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) (अजित पवार गट) या तिन्ही पक्षांत सतत नवी राजकीय इनकमिंग सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षा प्रतिभा शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी राजीनामा दिल्यानंतर आता त्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासोबत तब्बल 20 ते 25 हजार कार्यकर्तेही पक्षात दाखल होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
काँग्रेसमधील कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करताना शिंदे म्हणाल्या, "ज्या विश्वासाने आणि अपेक्षेने काँग्रेसमध्ये प्रवेश केला, तो अनुभव समाधानकारक नव्हता. जळगाव जिल्ह्यात बैठकांना न बोलावणे आणि काम करण्याची संधी न मिळणे यामुळे असंतोष वाढला." त्या पुढे म्हणाल्या, "पद दिल्याबद्दल आणि संधीबद्दल राहुल गांधींचे आभार, मात्र आता राष्ट्रवादीत नवा अध्याय सुरू करणार आहे."
राष्ट्रवादीत प्रवेशाचा मोठा सोहळा 17 ऑगस्ट रोजी जळगावातील शिवतीर्थ मैदानावर होणार असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडेल. हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या प्रवेशामुळे काँग्रेसला धक्का बसणार हे निश्चित आहे.
तसेच, राष्ट्रवादीत प्रवेशानंतर योग्य पदाची अपेक्षा असून, अजितदादांनी त्याबाबत हमी दिल्याचंही शिंदे यांनी स्पष्ट केले.