‘लाडकी बहीण’ योजनेला खडाखडी; पाच महिन्यांपासून एकही नवा अर्ज नाही

    13-Aug-2025
Total Views |
 
Ladki Bahin scheme
 (Image Source-Internet)
मुंबई :
राज्य सरकारची चर्चेत असलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना (Ladki Bahin scheme) सध्या स्थिरावलेल्या अवस्थेत आहे. गेल्या पाच महिन्यांपासून या योजनेसाठी एकही नवीन अर्ज दाखल झालेला नाही. सुरुवातीला तब्बल १ कोटी ५९ लाखांहून अधिक महिलांना पात्रता मिळाली होती, मात्र आता नव्या अर्जांची नोंद थांबलेली आहे.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढील पाच वर्षे हा उपक्रम सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले असून, दरमहा मिळणारे १५०० मानधन वाढवण्याचा विचारही व्यक्त केला आहे. परंतु, काही अपात्र महिलांनी चुकीची माहिती देऊन लाभ घेतल्याचे प्रकार समोर आल्याने, अनेकांचे मानधन तात्पुरते रोखण्यात आले आहे.
 
काही अर्जांमध्ये लाभार्थ्यांचा फोटो न देता मोटारसायकलचा फोटो लावल्याचेही निदर्शनास आले आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना लाभार्थ्यांची सखोल पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
 
ही योजना लोकसभा निवडणुकीनंतर सुरु झाली होती आणि विधानसभा निवडणुकीत महायुतीला त्याचा फायदा झाल्याचे निरीक्षण नोंदवले गेले आहे. तपासणीदरम्यान लाखो अपात्र लाभार्थ्यांना वगळण्यात आले असून, पुणे जिल्ह्यात सर्वाधिक महिलांनी लाभ घेतला आहे. विशेष म्हणजे, ६५ वर्षांवरील लाभार्थ्यांचे प्रमाण लक्षणीय आहे.
 
सध्या या योजनेमुळे राज्याच्या वार्षिक अर्थसंकल्पावर जवळपास ५० हजार कोटींचा ताण येत असल्याची चर्चा असून, इतर विकास प्रकल्पांवर त्याचा परिणाम होण्याची भीती आहे.
 
प्रारंभी २ कोटी ६३ लाख अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी २ कोटी ३४ लाख महिलांना मानधन सुरू झाले, नंतर ही संख्या २ कोटी ४७ लाखांवर स्थिरावली. गेल्या तीन महिन्यांत या आकड्यात कोणताही बदल झालेला नाही.
 
सध्या महापालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता, पडताळणी प्रक्रिया तात्पुरती स्थगित आहे. निवडणुका होईपर्यंत सर्व नोंदणीकृत लाभार्थ्यांना मानधन दिले जाणार असून, त्यानंतर पुढील निर्णय होण्याची शक्यता आहे.