मुंबई :
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत विदर्भ आणि मुंबईतील भाजप तसेच काँग्रेसमधील अनेक पदाधिकाऱ्यांनी आज मातोश्री येथे शिवसेनेत प्रवेश केला. या स्वागत सोहळ्यात उद्धव ठाकरे यांनी नव्या कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक स्वागत करताच भाजपवर तीव्र शब्दात टीका केली.
भाजपवर भ्रष्टाचार आणि सत्ता टिकवण्याचा आरोप-
उद्धव ठाकरे म्हणाले, “देशभर आणि महाराष्ट्रात उघडपणे भ्रष्टाचार सुरू आहे. शासन यंत्रणा बेबंदशाहीच्या मार्गाने चालत आहे. भ्रष्टाचार्यांवर कोणतीही कारवाई होत नाही आणि त्याकडे कोणी लक्षही देत नाही. काल दिल्लीमध्ये जे घडलं ते लोकशाहीसाठी धोक्याचं आहे – 300 खासदारांना अटक झाली. मतांची चोरी करून मिळवलेली सत्ता आता उघड होत आहे. जनतेच्या डोळ्यावरचा पडदा दूर होत असून या सत्तेची आता समाप्ती जवळ आली आहे.”
शेतकरी आंदोलनाची आठवण-
उद्धव ठाकरे यांनी दोन-तीन वर्षांपूर्वीच्या शेतकरी आंदोलनाचा उल्लेख करताना सांगितले, “शेतकऱ्यांच्या मार्गात खिळे पसरवले, बॅरिकेट्स लावले, पण जनतेने निवडून दिलेल्या खासदारांना संसदेत प्रश्न विचारू दिला जात नाही. मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे दिले तरी कारवाई होत नाही. हे सरकार केवळ फसवेगिरी करून आले आहे.”
नवे कार्यकर्ते, नवा जोश-
शिवसेनेत आलेल्या नव्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक करत उद्धव ठाकरे म्हणाले, “सत्तेच्या मोहात अनेकजण भाजपकडे गेले, पण आता तेच निराश झाले आहेत. कारण भाजपची सत्ता आता ढासळण्याच्या मार्गावर आहे. आपण सर्वांनी जनतेच्या लढ्यासाठी एकजूट होऊन काम करायचे आहे.”