निवडणूक आयोग रखवालदार नाही, सत्ताधाऱ्यांचा साथीदार; संजय राऊतांचा घणाघात

12 Aug 2025 19:34:28
 
Sanjay Raut attack EC
 (Image Source-Internet)
नवी दिल्ली :
लोकशाही वाचवण्यासाठी ३०० हून अधिक खासदारांनी दिल्लीच्या रस्त्यावर उतरून निवडणूक आयोगाविरोधात (Election Commission) केलेल्या मोर्च्यानंतर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आयोगावर तीव्र शब्दांत टीका केली. “ज्यांच्यावर निवडणुकीची शुचिता जपण्याची जबाबदारी आहे, तीच संस्था आता सत्ताधाऱ्यांच्या हातातील बाहुले बनली आहे. रखवालदाराच्या खुर्चीवर चोर बसला आहे,” असा आरोप त्यांनी केला.
 
राऊत म्हणाले, “संसद हे लोकशाहीचं पवित्र मंदिर आहे, पण त्या मंदिरात घुसून सत्तेत आलेले लोक आमच्याभोवती फिरत आहेत. निवडणूक आयोग त्यांच्या साथीदारासारखं वागत आहे. काल आम्ही आयोगाकडे जाण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांनी आम्हाला अडवलं, बॅरिकेड्स लावले, धक्काबुक्की केली. आम्ही कोणते दहशतवादी आहोत का?”
 
ते पुढे म्हणाले, “३०० खासदार आयोगासमोर गेले असते तर त्यांना काही बिघडलं असतं का? आयोग नेमका कोणाला घाबरतोय? निष्पक्ष निवडणुका घेणे ही त्यांची जबाबदारी आहे, पण आता तेच सत्ताधाऱ्यांना विरोधक दडपण्यास मदत करत आहेत.”
 
राऊतांनी आयोगाला माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांची कार्यपद्धती अभ्यासण्याचा सल्ला दिला. “शेषन यांनी त्यांच्या काळात आचारसंहितेचं काटेकोर पालन करवून घेतलं. मोदी आणि शहा अजरामर नाहीत, त्यांनाही सत्तेतून आणि आयुष्यातून कधीतरी जावं लागेल. आयोगाच्या खुर्चीवर बसलेल्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे,” असे ते म्हणाले.
 
तसेच, आंदोलनादरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा उल्लेख करत राऊत म्हणाले, “अटकेची कागदपत्रं मुद्दाम उशिरा तयार करून आम्हाला संसदेत पोहोचू दिलं नाही, आणि त्याचवेळी सरकारने सगळी विधेयके मंजूर करून घेतली. मोदी, शहा, फडणवीस हे सरळमार्गाने नव्हे तर कारस्थानी डावपेचांनी सत्तेत आले आहेत,” असा घणाघात त्यांनी केला.
Powered By Sangraha 9.0