पावसाचा पुन्हा जोर वाढणार; राज्यातील अनेक जिल्ह्यांना हवामान विभागाचा ‘यलो अलर्ट’

12 Aug 2025 11:44:22
 
Rains
 (Image Source-Internet)
नागपूर:
राज्यात गेल्या काही दिवसांत पावसाचा (Rain) जोर कमी झाला असला तरी हवामान विभागाने पुन्हा एकदा पावसाचा इशारा दिला आहे. सोमवारी राज्यातील दहा जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला असून, बुधवारपासून पावसाची तीव्रता वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. विशेषत: विदर्भातील काही भागांना अतिवृष्टीचा इशाराही देण्यात आला आहे.
 
अलीकडे विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात पावसाची जोरदार नोंद झाली होती. जुलैच्या अखेरीस पावसाने उघडीप घेतली होती, मात्र आता हवामानात बदल होत असून, पुन्हा पावसाचे आगमन होण्याची शक्यता आहे.
 
कोकण – ११ ऑगस्ट रोजी पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ढगांचा गडगडाट आणि हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता.
 
पश्चिम महाराष्ट्र – पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली व घाटमाथा परिसरात हलका ते मध्यम पाऊस पडणार; सोलापूर जिल्ह्यात वीजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस अपेक्षित असल्याने ‘यलो अलर्ट’.
 
मराठवाडा – छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली येथे हलका ते मध्यम पाऊस; नांदेड, लातूर व धाराशिव जिल्ह्यांत वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज, या तिन्ही ठिकाणी ‘यलो अलर्ट’.
 
उत्तर महाराष्ट्र – नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर येथे हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता.
 
विदर्भ – नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि यवतमाळ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’; तर १३ ऑगस्टपासून गडचिरोली आणि यवतमाळला ‘ऑरेंज अलर्ट’. अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा आणि वाशीम येथे पाऊस होण्याची शक्यता नाही.
 
हवामान खात्याच्या मते, पश्चिम उत्तर प्रदेशावर समुद्रसपाटीपासून ३.१ किमी उंचीवर चक्राकार वारे वाहत असून, बंगालच्या उपसागरात बुधवारपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार होईल. या बदलामुळे विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढेल.
Powered By Sangraha 9.0