उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएचा उमेदवार आज ठरणार; आचार्य देवव्रत यांचे नाव आघाडीवर

12 Aug 2025 13:45:24
 
Vice Pre sident
(Image Source-Internet)
नवी दिल्ली :
उपराष्ट्रपती (Vice President) जगदीप धनखड यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे दिलेल्या राजीनाम्यानंतर हे पद रिक्त झाले असून, निवडणूक आयोगाने उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची तारीख जाहीर केली आहे. त्यामुळे राजधानीत राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
 
एनडीएच्या घटक पक्षांनी उमेदवार निवडण्याचा निर्णय थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या हाती दिला आहे. आजच या दोन्ही नेत्यांकडून एनडीएचा अधिकृत चेहरा जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, जगदीप धनखड हे राजस्थानातील जाट समाजाचे प्रतिनिधी होते. त्यांच्या निरोपानंतर या समाजात नाराजीचे वातावरण असून, पुन्हा जाट समाजातील व्यक्तीला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. यामध्ये गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे नाव सर्वाधिक चर्चेत आहे. देवव्रत हे हरयाणातील असून, तेही जाट समाजाशी संबंधित आहेत.
 
निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २१ ऑगस्ट आहे, तर मतदान ९ सप्टेंबर रोजी होणार आहे. नुकत्याच संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मोदी आणि नड्डा यांना उमेदवार निवडण्याचा अधिकार देण्यात आला. या बैठकीत एनडीएच्या सर्व घटक पक्षांचे नेते उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0