(Image Source-Internet)
नागपूर :
मंगळवारी दुपारी नागपूर (Nagpur) शहरावर पावसाने जोरदार हल्ला चढवला. गेल्या पंधरवड्यापासून केवळ अधूनमधून कोसळणाऱ्या किरकोळ सरींवर समाधान मानावे लागणाऱ्या नागपूरकरांना आजच्या मुसळधार पावसाने दिलासा मिळाला. प्रखर उकाडा व दमट हवेतून त्रस्त झालेल्या नागरिकांना या सरींनी गारवा जाणवला.
दुपारी साधारण तीनच्या सुमारास सुरू झालेला पाऊस साडेचारपर्यंत अव्याहत कोसळत राहिला. अवघ्या दीड तासांच्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचले. बाजारपेठा, महत्त्वाचे चौक आणि निवासी भागांत पाण्याचे लोट वाहू लागल्याने काही ठिकाणी वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. तापमानात झालेल्या घसरणीमुळे नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला.
गेल्या काही दिवसांपासून पिकांसाठी पाण्याची तुटवड्याची भीती असलेल्या शेतकऱ्यांनाही या पावसाचा मोठा फायदा होणार आहे. पंधरा दिवसांपासून थोड्याथोडक्या सरींवर समाधान मानल्यानंतर आलेला हा पाऊस पिकांसाठी वरदान ठरण्याची आशा व्यक्त होत आहे.
दरम्यान, हवामान विभागाने नागपूर व परिसरात पुढील तीन तासांत मूसळधार पावसाचा इशारा दिला असून, नागरिकांनी बाहेर पडताना सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.