(Image Source-Internet)
नागपूर :
कोतवाली परिसरात रविवारी घडलेल्या भीषण अपघातात ४० वर्षीय महिलेला आपला जीव गमवावा लागला. काम सुरू असताना तिचे केस कापूस प्रक्रिया करणाऱ्या मशीनमध्ये अडकले आणि त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला.
मृत महिलेची ओळख कल्पना रूपचंद कामडी (वय ४०, रा. जुनी मंगलवारी, पिंटू सावजी हॉटेलजवळ, लकडगंज) अशी झाली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, १० ऑगस्ट रोजी दुपारी साडे दोन वाजताच्या सुमारास कल्पना या नवाबपूरा मशीदजवळील ‘भारत गादी हाऊस’ या दुकानात काम करत होत्या. हे दुकान मालक मोहम्मद एजाज शेख रफिक शेख (वय ४३) यांचे आहे.
कामाच्या दरम्यान मशीनमध्ये अचानक तिचे केस अडकले. त्यामुळे मशीनने डोके आत ओढल्याने ती गंभीर जखमी झाली आणि घटनास्थळीच प्राण सोडले.
कोतवाली पोलिसांनी दुकानमालकाच्या निवेदनावरून आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.