(Image Source-Internet)
मुंबई :
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. "भ्रष्टाचार्यांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना पाठीशी घालणाऱ्या फडणवीसांना लवकरच जनतेच्या रोषाचा सामना करावा लागेल. तेव्हा पळता भुई थोडी होईल," असा टोला त्यांनी लगावला.
दिल्लीतील इंडिया आघाडीतर्फे काढलेल्या मोर्च्याला पोलिसांनी अडवले, यावर बोलताना ठाकरे म्हणाले, "सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्राला भ्रष्टाचाराच्या यादीत पहिल्या क्रमांकावर पोचवले, पण विकासाच्या शर्यतीत मागे टाकले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष नाही, मात्र कुणी डान्सबार चालवतंय तर कुणी पैशांच्या बॅगा घेऊन बसलंय."
धनकड यांच्या अचानक हकालपट्टीवर प्रश्न-
ठाकरे यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांचा अप्रत्यक्ष उल्लेख करत, "भ्रष्टाचाराविरोधात पुरावे असूनही कारवाई नाही. धनकड यांना मात्र अचानक पदावरून काढून टाकलं, पण त्यामागचं कारण सांगितलं नाही. मग इतर मंत्र्यांना समज का दिली जात नाही?" असा सवाल केला.
चीनच्या पद्धतीची तुलना-
"चीनमध्ये सरकारविरोधात बोलणारे अचानक गायब होतात, तसाच पॅटर्न भारतात दिसतो आहे. उपराष्ट्रपती कुठे आहेत, त्यांची प्रकृती बिघडली असेल तर कुठल्या रुग्णालयात आहेत, हे तरी सांगा," अशी मागणीही ठाकरे यांनी केली.
'चीफ नव्हे तर थीफ मिनिस्टर'-
ठाकरे म्हणाले, "मला फडणवीसांची कीव येते. दिल्लीतील 'बापां'कडे पाशवी बहुमत असूनही भ्रष्ट मंत्र्यांना काढायची त्यांची हिंमत नाही. काँग्रेसने त्यांना 'चीफ मिनिस्टर' नव्हे तर 'थीफ मिनिस्टर' म्हटलंय, तो शब्द अगदी अचूक आहे. जर फडणवीसांमध्ये थोडासाही स्वाभिमान असेल, तर दिल्लीचा दबाव झुगारून द्या, नाहीतर महाराष्ट्रातील दबाव तुमच्यासाठी अधिक घातक ठरेल.