(Image Source-Internet)
विधानसभा निवडणुकांनंतर महाविकास आघाडीतील नेत्यांच्या बाहेर पडण्याची मालिका थांबण्याचं नाव घेत नाही. आता काँग्रेसलाही (Congress) मोठा फटका बसला आहे. जळगाव जिल्ह्यातील आदिवासी समाजातील प्रभावशाली नेत्या आणि काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा प्रतिभा शिंदे यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा जाहीर केला आहे. या घडामोडीमुळे राज्याच्या राजकारणात नवीन चर्चांना उधाण आलं आहे.
दोन वर्षांपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश करून लगेचच प्रदेश उपाध्यक्षपद मिळवलेल्या शिंदे यांच्या या निर्णयामागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र, त्यांचा राजकीय मार्ग राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडे वळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
महाविकास आघाडीसमोर वाढतं संकट
गेल्या काही महिन्यांत शिवसेना (ठाकरे गट) आणि काँग्रेसमधील अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी महायुतीकडे झुकत प्रवेश केला आहे. ठाकरे गटाला बसलेल्या मोठ्या फटक्यानंतर आता काँग्रेसलाही गळतीचा फटका बसला आहे. प्रतिभा शिंदे लवकरच अजित पवार यांच्या उपस्थितीत एनसीपीत प्रवेश करतील, अशी माहिती समोर आली आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो.
महायुती सज्ज, महाविकास आघाडी गोंधळात
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच जाहीर केलं की, भाजप, शिंदे गटाची शिवसेना आणि अजित पवार गट मिळून स्थानिक स्वराज्य निवडणुका महायुती म्हणून लढवतील. यामुळे महायुतीकडून जोरदार तयारी सुरू आहे. उलट, महाविकास आघाडीने अद्याप निवडणुकांबाबत ठोस धोरण जाहीर केलेलं नाही.
राजकीय तज्ज्ञांचं मत आहे की, घटक पक्षांतील गळती रोखणं हे सध्या महाविकास आघाडीसाठी सर्वात मोठं आव्हान आहे. महायुतीत होणाऱ्या सततच्या ‘इनकमिंग’चा परिणाम येणाऱ्या निवडणुकांमध्ये स्पष्टपणे दिसू शकतो.