(Image Source-Internet)
नागपूर :
मराठा साम्राज्याची अमूल्य धरोहर आणि नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक राजा रघुजी भोसले (Raghuji Bhosale) यांची ऐतिहासिक तलवार आता अधिकृतपणे महाराष्ट्राच्या मालकीची झाली आहे. लंडनमध्ये झालेल्या नीलामीत ही तलवार राज्य सरकारने २९ एप्रिल रोजी विकत घेतली होती. सोमवारी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांनी लंडनमध्ये या तलवारीचा अधिकृत ताबा स्वीकारला.
काही तांत्रिक कारणांमुळे ही खरेदी एका मध्यस्थामार्फत करण्यात आली होती. मात्र आता सर्व औपचारिकता पूर्ण झाल्याने ही तलवार लवकरच महाराष्ट्रात आणली जाणार आहे आणि तिचा कायमस्वरूपी ताबा राज्य सरकारकडे राहणार आहे.
छत्रपती शाहू महाराजांनी राजा रघुजी भोसले यांना "सेनासाहिबसुभा" ही पदवी दिली होती. रघुजी भोसले यांनी अनेक युद्ध मोहिमा यशस्वी केल्या आणि मराठा साम्राज्याचा विस्तार बंगाल, ओडिशा तसेच दक्षिण भारतापर्यंत केला. त्यांची ही तलवार मराठा शैलीतील ‘फिरंगी’ प्रकारची असून, एकधारी धार आणि सोन्याची नक्षी ही तिची खास वैशिष्ट्ये आहेत. तलवारीच्या पाठीमागील भागावर सोन्याच्या पाण्यात "श्रीमंत राघोजी भोसले सेनासाहिबसुभा" असा शिलालेख कोरलेला आहे.
इतिहासकारांच्या मते, १८१७ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने नागपूरच्या भोसले घराण्याचा खजिना लुटला तेव्हा ही तलवारही त्यांच्या ताब्यात गेली असावी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ऐतिहासिक क्षणाबद्दल आनंद व्यक्त करत सांगितले की, “राजा रघुजी भोसले यांची तलवार राज्याच्या मालकीत येणे हा महाराष्ट्रासाठी गौरवाचा क्षण आहे.”