(Image Source-Internet)
इंदूर :
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील वाढत्या व्यापारीकरणावर थेट बोट ठेवत सरकार आणि समाज दोघांनाही आरसा दाखवला. इंदूरमधील एका कर्करोग रुग्णालयाच्या उद्घाटनावेळी बोलताना त्यांनी स्पष्ट सांगितले की, आज या दोन मूलभूत गरजा — शिक्षण आणि आरोग्य — सामान्य नागरिकांसाठी परवडण्यासारख्या राहिलेल्या नाहीत.
भागवत म्हणाले, “ज्ञानाच्या युगात शिक्षण अत्यावश्यक आहे. पालक आपल्या मुलांच्या भविष्यासाठी घर विकायलाही तयार असतात. त्याचप्रमाणे, आरोग्यासाठी लोक आयुष्यभराची जमा पूंजी खर्च करण्यासही कचरत नाहीत. पण आज या सेवा ना स्वस्त आहेत, ना सहज उपलब्ध.”
व्यापारीकरणाचा वाढता दबाव-
त्यांच्या मते, शाळा आणि रुग्णालयांची संख्या वाढली असली तरी त्यांची फी आणि खर्च झपाट्याने वाढत आहेत. पूर्वी सेवाभावाने चालणारे हे दोन्ही क्षेत्र आता नफा कमावण्याच्या व्यवसायात रूपांतरित झाले आहेत. “जेव्हा एखादे क्षेत्र पूर्णपणे व्यापारात बदलते, तेव्हा ते सामान्य माणसाच्या हाताबाहेर जाते,” असे ते म्हणाले.
भागवत यांनी दिलेल्या उदाहरणानुसार, भारतातील शिक्षणव्यवस्था आता ‘ट्रिलियन डॉलर्स’च्या बाजारात बदलली आहे. अशा व्यापारीकरणामुळे गुणवत्तापूर्ण सेवा फक्त आर्थिकदृष्ट्या समर्थ लोकांपुरत्याच मर्यादित होत चालल्या आहेत.
सुधारणा आणि लोकसहभागाची गरज-
भागवत यांचे वक्तव्य केवळ टीका नसून सुधारण्याचे आवाहन असल्याचे उपस्थितांनी नमूद केले. त्यांनी समाजाने एकत्र येऊन शिक्षण आणि आरोग्य अधिक परवडणारे व सर्वांसाठी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
सध्या खासगी शाळांच्या वाढत्या फी आणि रुग्णालयांच्या महागड्या उपचारांवर देशभरात चर्चा सुरू आहे. ग्रामीण भागातील नागरिक अजूनही गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि आरोग्यासाठी शहरांकडे धाव घेत आहेत. अशा पार्श्वभूमीवर भागवत यांची टिप्पणी हे वास्तव अधोरेखित करणारे ठरले आहे.