महाराष्ट्रातील जनतेला खंडणीखोरांचा सरदार कोण हे चांगल्यानी माहिती;बावनकुळे यांची उद्धव ठाकरेंवर टीका

11 Aug 2025 14:53:12
 
Chandrashekhar Bawankule
 (Image Source-Internet)
नागपूर :
राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा शाब्दिक चकमकीचा स्फोट झाला असून, महसूल मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Bawankule) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर तीव्र प्रहार केला आहे. त्यांनी ठाकरे यांच्या भूतकाळावर बोट ठेवत, “महाराष्ट्रातील जनतेला खंडणीखोरांचा सरदार कोण आहे हे चांगलेच माहिती आहे. विधानसभा निवडणुकीत लोकांनी ‘मुख्यमंत्री’ आणि ‘थीफ मिनिस्टर’ यामधला स्पष्ट फरक दाखवून दिला. उद्योगपतींच्या घराबाहेर जिलेटिन ठेऊन तुमच्या नेतृत्वाखाली १०० कोटींची वसुली झाली होती, हे लोकांच्या विस्मृतीत गेलेले नाही,” असे ते म्हणाले.
 
बावनकुळे यांनी पुढे सांगितले, “आदरणीय देवेंद्र फडणवीसांवर बोलण्याआधी स्वतःचा इतिहास तपासा. इंडी आघाडीत तुमची किंमत शेवटच्या रांगेपुरतीच होती, हे महाराष्ट्राने अनुभवले आहे. त्यामुळेच दिल्लीतील आंदोलनात तुम्ही हजेरी लावली नाही. तिथे पुन्हा मागच्या रांगेत उभं राहावं लागेल, हे माहीत असल्याने तुम्ही इथे काही मोजक्या कार्यकर्त्यांसह आंदोलनाचा दिखावा केला. त्याचवेळी राहुल गांधींचं आंदोलन सुरू असताना, तुम्ही वेगळा पवित्रा घेऊन लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला, पण तो फसला.”
 
मुख्यमंत्रिपदाच्या त्यांच्या कारकीर्दीवर टीका करताना बावनकुळे म्हणाले, “सत्तेत असताना तुम्ही लोकशाहीचा आणि नैतिकतेचा गळा घोटला. पारदर्शकतेला तिलांजली देत घेतलेले निर्णय राज्याच्या लोकशाही व्यवस्थेला धक्का देणारे होते. आज देवेंद्र फडणवीसांसारख्या प्रामाणिक, स्थिर आणि विकासाभिमुख नेत्यावर आरोप करण्याआधी स्वतःकडे आरशात पाहणे आवश्यक आहे.”
 
फडणवीसांच्या नेतृत्वाची प्रशंसा करत बावनकुळे म्हणाले, फडणवीसांचा हेतू केवळ भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र उभारण्यापुरता मर्यादित नाही, तर विकासकेंद्री, पारदर्शक आणि स्थिर प्रशासन देणे हा आहे. त्यांच्या नेतृत्वावर महाराष्ट्राच्या जनतेचा पूर्ण विश्वास आहे. याउलट, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाबद्दल लोकांचा कंटाळा आणि नाराजी दिवसेंदिवस वाढत आहे.बावनकुळेंच्या या विधानांमुळे राज्याच्या राजकीय वातावरणात पुन्हा एकदा तणावाचे सावट दाटले आहे.
Powered By Sangraha 9.0