कोराडी दुर्घटनेवर उच्चस्तरीय चौकशीचा आदेश; पालकमंत्री बावनकुळे घटनास्थळी पाहणी

11 Aug 2025 12:30:09
 
Bawankule inspects Koradi
 (Image Source-Internet)
नागपूर :
कोराडी (Koradi) येथील श्री महालक्ष्मी जगदंबा देवस्थानातील बांधकामाधीन महाद्वाराचा स्लॅब कोसळल्याच्या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश महसूल मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. रविवारी त्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली.
 
नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (NMRDA) मंदिर परिसरात तीन मोठ्या महाद्वारांचे बांधकाम सुरू आहे. त्यापैकी दोन महाद्वारांची कामे पूर्ण झाली असून, तिसऱ्या महाद्वाराच्या उभारणीदरम्यान ही दुर्घटना घडली. या प्रकल्पाच्या देखरेखीची जबाबदारी व्हीएनआयटी आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट एजन्सीकडे असूनही अपघात घडल्याने गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. बावनकुळे यांनी एक महिन्यात चौकशी पूर्ण करून दोषींवर आवश्यक ती कारवाई करण्याचे आदेश दिले.
 
चार सदस्यीय चौकशी समिती-
या घटनेची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली असून, यात नागपूर महापालिका आयुक्त, जलसंपदा विभागाचे कार्यकारी संचालक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता आणि व्हीएनआयटीचे संचालक यांचा समावेश आहे.
 
अपघातात १६ मजूर जखमी झाले असून, त्यापैकी आठ जणांना उपचारानंतर रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. जखमींमध्ये नंदू भुजा, राजू कुमार, नंदकिशोर जाधव, मुकेश विंदाणे, सौरभ बोंडे, संजय धुर्वे, दशरथ कुमार, अरुण कुमार, बुलेट कुमार, रामाशिष यादव, कपिल भुया, नरेश बिहारीलाल बघेल, गुलशन पथवाल, संजय दुकाने, दत्ता वानखेडे आणि संतोष प्रसाद बिसन सिंग यांचा समावेश आहे.
 
मंदिर परिसरातील प्रत्येक कामात दर्जा, सुरक्षितता आणि पारदर्शकता यांना प्राधान्य दिले जाते. मात्र, मी बुलढाणा दौऱ्यावर असताना ही घटना घडली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. सर्व जखमींना शासन व मंदिर प्रशासनाकडून मदत दिली जाईल,” असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
Powered By Sangraha 9.0