नागपूरचा ट्रान्सपोर्ट हब हायकोर्टच्या हस्तक्षेपाने प्रकल्प मार्गी; नगरविकास विभागाची मंजुरी

01 Aug 2025 15:09:25
 
Nagpur transport hub project
 (Image Source-Internet)
नागपूर :
वर्षानुवर्षे फाईलच्या ढिगाऱ्यात अडकलेला नागपूरचा मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट हब प्रकल्प अखेर मार्गी लागला आहे. नागपूर रेल्वे स्थानकासमोर उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या जमिनीच्या वापरातील बदलास नगरविकास (Urban Development) विभागाने हिरवी झेंडी दाखवली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने प्रशासनाच्या उदासीनतेवर खरमरीत टिप्पणी करताच ही हालचाल झाली आहे.
 
महानगरपालिका, रेल्वे प्रशासन आणि एसटी महामंडळ यांनी मिळून या जागेचा वापर ट्रान्सपोर्ट हबसाठी करण्याची शिफारस केली होती. मात्र, प्रशासकीय प्रक्रियेत अडथळे येत असल्यामुळे योजना रखडली होती. 28 जुलै रोजी नगरविकास विभागाने याला अधिकृत मंजुरी दिल्याने आता प्रत्यक्ष काम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

महत्त्वाच्या मार्गांना जोडणारा हब-
या निर्णयामुळे रेल्वे स्थानक, एम्स रोड आणि वर्धा रोड यांना मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट हबद्वारे जोडण्याचे नियोजन आहे. यामुळे उडानपूल, मोमिनपुरा, लोहापुर, मसरस चौक अशा भागातील नागरिकांना वाहतूक कोंडी, पुनर्वसन आणि असुविधांमधून मोठा दिलासा मिळणार आहे.
 
सरकारने न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, प्रकल्पाचे काम पुढील तीन महिन्यांत सुरू होणार आहे. तसेच, कोर्टाने काम वेळेत पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेशही प्रशासनाला दिले आहेत. हा हब नागपूरकरांसाठी एक आधुनिक व सुसज्ज सार्वजनिक वाहतूक केंद्र ठरणार आहे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Powered By Sangraha 9.0